Karthiki Ekadashi : पहाटेपासून पंढरपुरात भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ; दर्शनासाठी लागतोय 20 ते 22 तासांचा वेळ
Karthiki Ekadashi : काल सकाळी 8 वाजेपासून दर्शन रांगेत उभे असलेल्या भाविकांना 24 तासानंतर दर्शन मिळाले आहे.
पंढरपूर (सोलापूर) : आज कार्तिकी अर्थात प्रबोधिनी एकादशी असून, आज देव चार महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात. चार महिन्यापूर्वी म्हणजेच आषाढी अर्थात देवशयनी एकादशीला विठुराया निद्रिस्त असतात आणि चातुर्मास संपल्यावर आज कार्तिकी एकादशीला देव जागे होतात. त्यामुळे आजच्या एकादशीला विठुरायाचे दर्शन हे वारकरी संप्रदायासाठी अतिशय महत्वाचे मानले जाते. त्यामुळे पहाटेपासून पंढरपुरात भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतांना पाहायला मिळत आहे. तर, कालपर्यंत भाविकांची संख्या कमी होती, पण पहाटेपासून हजारो भाविक दाखल झाल्याने पंढरपूर विठ्ठूनामाने दुमदुमून गेले आहे. विशेष म्हणजे, काल सकाळी 8 वाजेपासून दर्शन रांगेत उभे असलेल्या भाविकांना 24 तासानंतर दर्शन मिळाले आहे. तर, सध्या देवाच्या पायावरील दर्शनाला सरासरी 20 ते 22 तासांचा वेळ लागत असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भागवत धर्माची पताका पिढ्यानुपिढ्या वारकरी संप्रदाय पुढे घेऊन जात आहे. कितीही आक्रमणे झाली, संकटे आली तरी हा वारकरी संप्रदाय कधीही थांबला नाही, त्यांच्या पावलांनी नेहमीच पंढरीची वाट धरली. महाराष्ट्र धर्म वारकऱ्यांनी जिवंत ठेवला असून महाराष्ट्र धर्माचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिला तर संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला. सर्व संतांनी त्यांच्या विचार व आचरणातून सामान्य माणसाला असामान्य बनवले. अनेक पिढ्या बदलल्या परंतु भागवत धर्मावरील लोकांची श्रद्धा बदलली नाही, असे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरुवात
तर, मागील वर्षीच्या कार्तिकीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता संवर्धनाची संकल्पना मांडली होती, तर या कार्तिकीला मंदिर संवर्धन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 73 कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील 26 कोटीच्या विविध संवर्धन विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले, त्याबद्दल समाधान वाटत असून हे काम अत्यंत वेगाने व उत्कृष्ट दर्जाचे होईल यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संबंधित ठेकेदार यांनी काळजी घेतली पाहिजे, असे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असून श्री क्षेत्र पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन करण्यात येतील, असेही फडणवीस म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: