शरद मोहोळ हिंदुत्ववादी, म्हणून त्याची हत्या, शरदभाऊला परत पाठवा म्हणून देवाकडे प्रार्थना; भाजप आमदाराची मुक्ताफळे
T Raja Solapur Speech : आजचे हिंदु हे झोपलेले असून त्यांना आता जागे करण्याची वेळ आली आहे असं भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा म्हणाले.
सोलापूर: कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यात हत्या झाली. धमकी, खंडणी, हत्या यासारखे अनेक गंभीर गुन्हे असलेल्या शरद मोहोळची हत्या (Sharad Mohol Murder) त्याच्याच साथीदारांनी केली. मात्र आता तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह (BJP MLA T Raja) यांनी शरद मोहोळचं उदात्तीकरण केलंय. शरदभाऊची हत्या झाली, ते हिंदुत्ववादी होते, त्यांनी तुरूंगामध्ये जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवले. त्यामुळे शरद मोहोळ यांच्यासाठी प्रार्थना करा अशा शब्दात टी राजा यांनी शरद मोहोळची भलामण केलीय. सोलापुरात आयोजित केलेल्या हिंदु जन आक्रोश मोर्चात (Solapur Hindu Jan Akrosh Morcha) ते बोलत होते. एक कुख्यात गुंड अनेकांचा जीव घेतो, अनेकांना धमकावून खंडण्या गोळा करतो, अशा शरद मोहोळबाबत टी. राजा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रसंगी भाजपचे आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते.
शरद मोहोळ हा माझा मित्र, तो गोरक्षण करणारा होता, हिंदुत्ववादी होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली असं वक्तव्य भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा यांनी केलं. शरद मोहोळला परत पाठवा अशी देवाकडे प्रार्थना करा असं आवाहनही त्यांनी केलं.
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी त्याच्याच साथीदारांनी हत्या केली. त्यावर बोलताना भाजपचे तेलंगणाचे आमदार म्हणाले की, माझ्या मित्राची, शरदभाऊची हत्या केली. तो हिंदुत्ववादी नेता होता, गोरक्षण करणारा नेता होता. तुरुंगात जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवण्याचे काम शरदभाऊने केलं होतं. आता देवीकडे प्रार्थना करा आणि शरदभाऊला पुन्हा पाठवा अशी मागणी करा. आमच्यातलेच अनेक लोक दुष्मन झाले आहेत. त्यांना कसं ओळखायचं?
काय म्हणाले टी राजा?
सोलापूरच्या पवित्र धर्तीवर दुसऱ्यांदा हिंदू जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. जेव्हापासून मी पाहतोय कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे पण होश नाही. मी जर म्हटलं दोन मिनिटात पर्वत हटवा तर कार्यकर्ते हटवतील, पण आता जोश नाही तर होश ठेवून काम करावं लागेल. देशाला अखंड भारत कसं करता येईल यासाठी आपल्याला काम करावं लागेल.
महाराष्ट्रमध्ये लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड या सर्व बाबतीत विचार करण्याची गरज आहे. या मोर्चाच्या निमित्ताने आम्हाला झोपलेल्या हिंदुला जागे करायचे आहे. आजचे हिंदु कुंभकर्ण होतं चालले आहेत. इथल्या हिंदुंची रक्षा करण्यासाठी आम्ही हैदराबादमधून यायचं का? तुम्हाला स्वतःची रक्षा स्वतः करावी लागेल. कोणी विचारलं कुठल्या जातीचे तर त्यांना सांगा आम्ही हिंदु आहोत.
22 तारखेला मोठा उत्सव होतोय, आम्ही याचा कधीही विचार केला नव्हता. आपल्या सर्वांकडे अक्षता पोहोचल्या असतील. 22 तारखेला मोठा कार्यक्रम आहे. रामलल्ला झाँकी है, काशी, मथुरा बाकी आहे. अयोध्येत रामल्लला विराजमान झालेत, आता मथुरामधील अतिक्रमण हटवले जाईल. काशीमध्ये ज्योतिर्लिंग तोडून एक ढाचा तयार केला आहे.
वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून नितेश राणेंची टीका
वक्फ कायदा हा केवळ आपल्या देशात आहे, असा कायदा कोणत्याही इतर समाजासाठी नाही, इतकंच काय कुठल्याही इस्लामिक देशात ही कायदा नाही. आपल्या देशात जेवढी जमीन रेल्वे आणि सैन्याची नाही तेवढी जमीन वक्फ बोर्डाने घेऊन ठेवली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकची जमीन कोणाकडे असेल तर ती वक्फची आहे. जिथे अशी जमीन वक्फची म्हणून मागायला येतील तिथे तुम्ही विरोध करून उभे राहिला तर राज्य आणि केंद्र सरकार तुमच्या मागे राहिल.
ही बातमी वाचा: