Pandharpur : अभिजीत पाटलांसह कारखान्याच्या संचालकांवर शिखर बँकेकडून तक्रार, लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेरण्याची तयारी सुरू
Abhijeet Patil : राष्ट्रवादीच्या अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखानाच्या संचालकांवर गुन्हा नोंदवण्यात यावा असं पत्र शिखर बँकेने पोलिसांना दिलं आहे.
सोलापूर: लोकसभा निवडणुकीची पडघम लवकरच वाजणार असताना आता राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतंय. राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँकेकडून घेतलेल्या कर्जाची करारानुसार परतफेड न केल्याने संचालक मंडळावर गुन्हा नोंदवण्याबाबतची तक्रार बँकेच्या वतीने पंढरपूर तालुका पोलिसांकडे करण्यात आली आहे.
अभिजीत पाटील शरद पवार गटाचे नेते
दरम्यान यावर तोडगा शोधण्यासाठी चेअरमन अभिजित पाटील हे बँकेच्या अधिकार्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत जाणार आहेत. हा प्रकार पूर्वीच्या संचालक मंडळाच्या काळातील असल्याचा खुलासा अभिजित पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. अभिजित पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यात काम पाहत आहेत .
तालुका पोलिसांना हे पत्र शिखर बँकेचे अधिकारी कैलास नामदेव घनवट यांनी दिले आहे. दरम्यान या प्रकरणाने सोलापुरातील कारखानदारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विठ्ठल कारखान्याने शिखर बँकेकडून कर्ज घेतले असून डिसेंबर 2023 पर्यंत 254 कोटी लाख रूपये कर्ज आणि 177 कोटी 68 लाख रूपये व्याज इतकी रक्कम बँकेस येणे आहे. दरम्यान, 2021 मध्ये कारखाना आणि बँक यांच्यात करार होवून प्रति क्विंटल साखरेवर 800 रूपये प्रमाणे बँकेचे देणे परत करण्याचे ठरले होते.
बँकेचे कारखान्यावर आरोप
दरम्यान, 2022 ला कारखान्याची निवडणूक होवून येथे अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ निवडून आले. त्यांनी हा कारखाना 2022-23 या हंगामात चालवून जवळपास सव्वा सात लाख टन ऊस गाळप करून 6 लाख 64 हजार साखर पोती तयार केली. कारखान्याच्या करारानुसार बँकेला प्रति पोते 800 रूपयांप्रमाणे 53 कोटी 15 लाख रूपये देणे अपेक्षित होते. मात्र ते पैसे बँकेत भरले गेले नाहीत. तसेच कारखान्याने उपपदार्थांची परस्पर विक्री केली आहे.
बँकेबरोबर झालेल्या कराराची माहिती असताना देखील विठ्ठल कारखान्याने कर्जाची रक्कम न भरल्याने संचालक मंडळ हे वैयक्तिक आणि सामूदायिक यास जबाबदार असल्याचा ठपका बँकेने ठेवला. यासाठी अध्यक्ष अभिजित पाटील आणि वीस संचालकांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी पंढरपूर तालुका पोलिसांना पत्र देण्यात आले. याबाबतची तक्रार पोलिसात दिली गेली आहे.
हा करार गेल्या वेळच्या संचालकांचा, अभिजीत पाटलांची माहिती
दरम्यान, याबाबत अध्यक्ष अभिजित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा करार आमच्या काळातील नसून मागील संचालक मंडळाने केला आहे. आम्ही कारखान्यात आल्यावर प्रारंभी ऊस उत्पादकांची थकीत तीस कोटींची रक्कम दिली. तसेच शिल्लक साखर विक्रीतून आलेले पैसे बँकेला भरले होते. यानंतर हंगाम सुरू केला होता. त्यावेळी ऊस उत्पादकांना पैसे देणे आवश्यक असल्याने यासाठी पैसा वापरला गेला आहे.
दरम्यान, शिखर बँकेच्या अधिकार्यांशी चर्चा करण्यासाठी आपण मुंबईत जात आहोत. यानंतर सविस्तर प्रतिक्रिया माध्यमांना देवू असे अभिजित पाटील यांनी सांगितले
ही बातमी वाचा: