Gulabrao Patil : आम्ही बंड केल्यामुळे भाजप सत्तेत, नाहीतर तुम्हाला सत्ता मिळाली असती का? गुलाबराव पाटलांचा भाजपला सवाल
Jalgaon : जळगावमधल्या महायुतीच्या मेळाव्यातही नाराजीनाट्य घडल्याचं दिसून आलं. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यासह गुलाबराव पाटलांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली.
जळगाव : राज्यभर महायुतीचे मेळावे होत असताना त्यांच्या घटक पक्षांनी मात्र भाजपवर नाराजी व्यक्त केल्याच्या घटना घडत आहेत. जळगावमध्ये महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यासह गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) भाजपवर नाराजी व्यक्त केली. आम्ही बंड केल्यामुळंच भाजप सत्तेत आल्याचं राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय.
आम्ही बंड केलं नसतं तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का? असा थेट सवाल गुलाबराव पाटलांनी भाजपला विचारला. तसेच राम मंदिर कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही असंही ते म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार असताना या महायुतीमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने आज जळगावमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपसोबत गेल्यावर आम्हाला काय त्रास झाला ते कुटुंबाला माहीत
गुलाबराव पाटील म्हणाले की, "तुमच्या वेळेस बरोबर होते आणि आमच्या वेळेला गडबड होत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेत असताना आम्ही भाजपा सोबत गेलो त्यावेळी वर्षभर आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला काय त्रास सहन करावा लागला हे आमच्या कुटुंबाला माहीत. आमचं काय होईल हे माहीत नसताना आम्ही धोका पत्करून आपल्यासोबत आलो आहोत याची जाणीव ठेवायला हवी."
राम मंदिर सोहळा प्रश्नांवरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजीचा सूर लगावला. ते म्हणाले की, मागील काळात मशीद पडली त्यावेळी आपणही त्यामध्ये सहभागी होतो. आपल्याला जेलमध्ये जावे लागले होते. राम सर्वाचा आहे, रामाला प्रायव्हेट कंपनी करू नका.
आगामी काळात निवडणुका डोळ्या समोर असल्याचं पाहता आता महा युती मधील तिन्ही पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी समन्वय साधून निवडणुकात सहभागी झाले तर यश नक्की मिळणार आहे. केवळ लोकसभा आणि विधानसभाच नव्हे तर सर्वच निवडणुकीत एकीने लढायला हवे अशी अपेक्षा ही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
माझ्या निवडणुकीच्या वेळी अपक्षाला पुढे केलं
शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीही भाजपवर नाराजी व्यक्त करताना म्हटलं की, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना भाजपा युती आहे. मात्र शिवसेनेनं कधीही गद्दारी केलेली नाही. मात्र माझ्या उमेदवारीच्या वेळेस एका अपक्ष उमेदवाराला पुढे करण्यात आले. एवढंच काय तर नंतर त्याला भाजप तालुका अध्यक्ष बनवण्यात आले. बाजार समिती निवडणुकीमध्येही भाजपाने युतीधर्म निभावला पाहिजे होता, मात्र त्यावेळीही त्यांनी साथ दिली नाही.
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केलेली नाराजी पाहता महायुतीमध्ये वरवर आलबेल दिसत असले तरी आत मात्र धुसफुस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.
ही बातमी वाचा: