(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vat Purnima 2022 : तळकोकणात पुरुषांची वटपौर्णिमा, जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वडाला फेऱ्या
Vat Purnima 2022 : जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून पुरुष वटपौर्णिमा साजरी करताना वडाला फेऱ्या मारतात हे केव्हा ऐकलं नसेल किंवा पाहिलं नसेल. पण हे घडतंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ गवळदेव येथे.
सिंधुदुर्ग : ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी आपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वटवृक्षाची पूजा करतात. हळद-कुंकू हे सौभाग्याचं प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात. वडाला पाच प्रदक्षिणा मारुन सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात. सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमाकडून कसे परत मिळवले, याची पौराणिक कथा सांगितली जाते तोच हा वटपौर्णिमेचा सण. याच पौराणिक कथेचं स्मरण वटवृक्षाचे पूजन आणि सौभाग्य वरदान मागण्याचा हा दिवस.
पत्नी जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी परंपरेने वटपौर्णिमा साजरी करते. पण तुम्ही पुरुष जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वटपौर्णिमा साजरी करताना वडाला फेऱ्या मारतात हे केव्हा ऐकलं नसेल किंवा पाहिलं नसेल. पण हे घडतंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ गवळदेव येथे. गेली 12 वर्षे हे डॉक्टर ,प्राध्यापक आणि इतर पुरुष जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वडाला साकडं घालत पत्नी प्रति प्रेमभाव व्यक्त करतात. पत्नीच्या प्रति प्रेमभाव आदर, तिचा सन्मान आणि पती-पत्नी समानता दर्शवण्यासाठी, पत्नीला उदंड आयुष्य तसंच अविरत प्रेमासाठी जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारत ही आगळीवेगळी वटपौर्णिमा सिंधुदुर्गात साजरी होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. मात्र कुडाळमध्ये पुरुषांनीही वटपौर्णिमा साजरी केली. गेली 12 वर्ष कुडाळ शहरातील पुरुष मंडळी वटपौर्णिमा साजरी करता. आपल्या पत्नीला दीर्घायुष्य मिळावं तसेच जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, स्त्रीचा सन्मान व्हावा आणि आपल्या पत्नीवरील प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत व्हावं यासाठी हे पुरुष वटपौर्णिमा साजरी करतात.
सात सेकंदही अशी बायको नको
औरंगाबादच्या वाळूज भागात असलेली पत्नीपीडित नावाची ही संघटना नेहमीच पत्नीच्या छळापासून त्रासलेल्या नवऱ्यांना मदत करण्याचे काम करते. मात्र याचवेळी त्यांनी वटपौर्णिमेचा मुहूर्त साधत अनोखं आंदोलन केलं आहे. तसेच पुरुषांना त्रास देणाऱ्या महिलांचा निषेध केला. पिंपळाच्या झाडाला गोल फिरत दोरा बांधून मुंजा असलेल्या पिंपळाच्या झाडाची पूजा या पत्नीपीडित पुरुषांनी केली. सोबतच पुढील सात जन्मच काय सात सेकंद सुद्धा अशी बायको नको, अशा घोषणा देत, पिंपळाच्या झाडाला उलट्या 108 प्रदक्षिणा घालत पत्नीपीडित पुरुषांनी पूजन केले आहे.
संबंधित बातम्या
- 7 सेकंदही अशी बायको नको; पत्नीपीडित नवरोबांची पिंपळपौर्णिमा, झाडाला 108 उलट्या प्रदक्षिणा
- Trupti Desai In Pune: वटपोर्णिमा फक्त सुवासिनींचा सण नाही त्यामुळे विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी:तृप्ती देसाई
- Vat Purnima 2022 : वाट पाहते पुनवेची.. आज वटपौर्णिमा! जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व
- Vat Purnima | सिंधुदुर्गातील 'या' गावात पुरुषही वटपौर्णिमा साजरी करतात!