(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Savdav Waterfall : हिरव्यागार वनराईतून फेसाळत कोसळणारा सावडाव धबधबा प्रवाहित
वर्षा पर्यटनासाठी अनेक जणांना कोकणातील धबधब्याजवळ पर्यटनाचा आनंद लुटायचा असतो. त्यासाठी सर्वात सुरक्षित असा सावडावचा धबधबा आहे.
Sindhudurg Savdav Waterfall : मुंबई-गोवा महामार्गावर जर तुम्ही प्रवास करत असाल तर कणकवली पासून काही अंतरावर असणारा निसर्गरम्य सावडाव धबधबा पावसामुळे प्रवाहित झाला आहे. वर्षा पर्यटनासाठी अनेक जणांना कोकणातील धबधब्याजवळ पर्यटनाचा आनंद लुटायचा असतो. त्यासाठी सर्वात सुरक्षित असा सावडावचा धबधबा आहे. जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत.
सावडाव धबधबा ठिकाणी प्रवेशद्वारावर अभ्यंगत कर ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक पर्यटकाला लावला जात आहे. दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी यावर तोडगा म्हणून पार्किंग कर देखील लावला जात आहे. सावडाव धबधबा ठिकाणी सर्व पर्यटकांनी येताना दरवर्षी प्रमाणे आनंद लुटावा व सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपचायतीतर्फे केले आहे.
गर्द हिरव्यागार वनराईतून फेसाळत कोसळणारा सावडाव धबधबा 60 ते 70 फूट रुंदीचे आणि 30 फूट उंचीच्या काळ्या कातळावरुन फेसाळत कोसळतो. गर्द वनराईतून वाहत या धबधब्याचं रुपांतर पुढे ओहळात होते. मुंबई-गोवा महामार्गावरुन सावडाव धबधबा जवळ असल्याने पर्यटकांचं आवडीचं ठिकाण आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पर्यटकांना जाण्यास बंदी होती. आता मात्र सावडाव धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत.
जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात आंबोलीचा मुख्य धबधबा, बाबा धबधबा, नागरतास धबधबा, सावडाव धबधबा, मांगेली धबधबा, नापणे धबधबा, असनिये धबधबा असे अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. जिल्हासह राज्यातील पर्यटक फेसाळत कोसळणाऱ्या धबधब्यावर पर्यटक आनंद लुटत आहेत.
राजापुरातील सवतकडा धबधबा प्रवाहित
कोकणात पावसाने दमदार लावली असून कोकणच्या सौंदर्यात भर पडली आहे. चारही बाजूला हिरवळ त्यात दाट धुके आणि ओसंडून वाहणारे धबधबे जणू स्वर्गची अनुभूती मिळते. अशाच वातावरणात कोकणातील राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध सवतकडा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. दीडशे ते दोनशे फुटांवरुन कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा वर्षा पर्यटनासाठी सज्ज झाला आहे. फेसाळणारा धबधब्याखाली आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येथे हजेरी लावतात. मुंबई-गोवा या महामार्गावर असलेल्या तिवंडामाळ गावातून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असणारा या कोकणातील फेसाळणारा धबधबा पर्यटकांना पुन्हा आकर्षित करत आहे. पण हे सगळे करत असताना आवश्यक ती काळजी घेऊनच धाडस टाळून स्थानिकांच्या सूचनांकडे लक्ष देत हा पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटायला हवा.