Sindhudurg News : पंतप्रधान मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर, शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे करणार अनावरण
Sindhudurg News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते सिंधुदुर्ग किल्याला देखील भेट देणार आहेत.
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे 4 डिसेंबर रोजी कोकणात येणार असून ते सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर देखील जातील. त्याचप्रमाणे तिथे असलेल्या एकमेव छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या मंदिरात जाऊन दर्शन देखील घेणार आहेत. यानिमित्ताने 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्गातील पर्यटन देखील पूर्णपणे बंद राहणार आहे. या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. हे अनावरण झाल्यानंतर ते तारकर्ली येथील नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या प्रात्यक्षिकांना हजर राहतील.
मालवण येथे नौदल दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सर्व दिग्गजांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तारकर्ली केंद्र तयारी करत असल्याची माहिती देण्यात आलीये. त्यासाठी सर्व पातळीवर सुधारणा करण्यात आल्या आहे. स्वच्छता, सुभोभिकरण यांसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे देखील उपस्थित राहतील.
असं असेल दौऱ्याचं नियोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबर रोजी अंदाजे दुपारी 3 वाजता गोव्यातील मोपा विमानतळावर उतरतील. त्यानंतर ते राजकोट किल्ल्याकडे रवाना होतील. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ते अनावरण करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत. तिथे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकमेव मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर नरेंद्र मोदी तारकर्ली इथं नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या प्रात्यक्षिकांना हजर राहतील. याठिकाणी पंतप्रधान मोदी हे जनतेला संबोधित करतील. प्रात्यक्षिक सुरू झाल्यानंतर काही वेळ थांबून ते पुन्हा एकदा गोवा विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होतील.
अंदाजे 3 वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पंतप्रधान मोदी हे सिंधुदुर्गात असतील. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांविषयी अधिकृत माहिती देण्यात आली नाही. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. मालवण तारकर्लीतल्या बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आलाय. दरम्यान या दौऱ्यादरम्यान आणखी कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.