(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
Bharat Gogawale : शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीत 45 हजार मतांनी विजय मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
रायगड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. भरत गोगवले यांनी विधानसभेच्या मतदानानंतर एबीपी माझासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाडमध्ये 2 लाख 11 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, असं गोगावले यांनी म्हटलं. भरत गोगावले यांनी यावेळी 45 हजार मतांची आघाडी घेणार असल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे त्यांनी मताधिक्य 40 हजारांच्या खाली जाणार नाही, असं देखील म्हटलं. यावेळी मंत्रिमंडळात बसणार असून कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार असल्याचं देखील गोगावले म्हणाले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिलांना एसटी तिकीटामध्ये सवलत या योजनांचा फायदा झाल्यामुळेच महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला आहे. सरकारने लाभाच्या योजना दिल्यानेच महिलांच्या मतदानाचा टक्का वाढण्यात मदत झाली,असं भरत गोगावले म्हणाले.
दरवेळेला केला जातो तसाच बंडखोर उमेदवारांचा विजयी झाल्यानंतर विचार केला जाईल. अपक्ष उमेदवार होतात तसे विजयी पक्षासोबत जोडले जातात. तसेच बंडखोर उमेदवार देखील आम्हाला पाठिंबा देतील, असं भरत गोगावले म्हणाले. रायगडमधील महायुतीच्या सात जागा चांगल्या फरकानं निवडून येतील, असं देखील गोगावले यांनी म्हटलं. कोकणात महायुती एक नंबरला असेल. एखादी दुसरी जागा सोडली तर कोकणातील पालघर ते सिंधुदुर्ग पर्यंतच्या सर्व जागा आम्ही जिंकू, विरोधकांच्या एक ते दोन जागा येतील, असंही भरत गोगावले म्हणाले.
कोणत्याही खात्याचा मंत्री बनायला तयार
आमचा जल्लोष दरवेळी होतो मात्र यंदा अति जल्लोष करणार नाही. मला साथ देणाऱ्या सहकाऱ्यांचा मान राखून जल्लोष करणार आहे. विरोधक हारला म्हणून त्यांचं मन खराब होईल असा करणार नाही, असं भरत गोगावले म्हणाले. जिंकून आल्यावर महायुतीचा मंत्रिमंडळामध्ये बसेल, कोणत्याही खात्याचा मंत्री बनायला मी तयार असल्याचं भरत गोगावले म्हणाले. तुमच्यात धमक असेल तर कोणतंही काम घेऊन सिद्ध करू शकता,त्यासाठी मंत्री असणे गरजेचे नाही असंही भरत गोगावले यांनी म्हटलं.
दरम्यान, महाड विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवारामध्ये लढत झाली. शिवसेनेकडून भरत गोगावले आणि त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्नेहल जगताप विधानसभा निवडणूक लढवत आहेत.
इतर बातम्या :