Nilesh Rane : मी अजून किती दाढी पिकवायची? माझ्या मागून आलेले अनेक जण मंत्री झाले : निलेश राणे
Kudal Malvan Assembly Election : ज्या ठिकाणी साहेबांचा पराभव झाला त्या ठिकाणी निवडून यायचं आहे, येत्या 15 दिवसात मी आमदार होणार असं शिवसेना शिंदे गटाचे कुडाळचे उमेदवार निलेश राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग : मी अजून किती दाढी पिकवायची? माझ्या मागून आलेले अनेक जण मंत्री झाले. ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, अमित देशमुख, विश्वजीत कदम हे सर्व माझ्यानंतर आमदार-खासदार होऊन मंत्री झाले. मात्र मला कुडाळ मालवण विधानसभेच्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी असं शिवसेना शिंदे गटाचे कुडाळचे उमेदवार निलेश राणे यांनी म्हटलं. जिथे माझ्या साहेबांचा पराभव झाला तिथेच मला निवडून यायचं आहे, म्हणून कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक लढतोय असंही ते म्हणाले. कुडाळ-मालवणमधील सभेत बोलताना निलेश राणेंनी हे वक्तव्य केलंय.
लोकसभेत नारायण राणे निवडून यावेत असं नियतीला मान्य होतं म्हणून ते लोकसभेत निवडून आले आणि आता विधानसभेला निलेश राणे निवडून आला पाहिजे असंही नियतीला मान्य असल्याचं दिसतंय असं निलेश राणे म्हणाले.
आम्ही भरगच्च असा पक्ष प्रवेश करतो, मात्र विरोधक पक्षप्रवेश घेत असताना दोन पाच दहा लोकांचा घेतात असं निलेश राणे म्हणाले. मी जबरदस्तीचे पक्षप्रवेश करत नाही, मी दांडे घेऊन कुठल्याही प्रशासकीय ऑफिसमध्ये जात नाही असा टोलाही त्यांनीवैभव नाईक यांचे नाव न घेता लगावला.
तर वैभव नाईकांचा सत्कार केला असता
2009 पासून विधिमंडळात जायची इच्छा होती. नारायण राणे यांनी जे विधिमंडळात भाषणं केली, त्या भाषणांचा प्रभाव आजही आमच्यावर आहे. नारायण राणे यानी त्यावेळी विधिमंडळ गदागदा हलवलं होतं. वैभव नाईक यांनी विधिमंडळात एक जरी भाषण केलं असतं तरी मला समाधान वाटल असतं. मी त्यांचं अभिनंदन केलं असतं. वैभव नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी करोड रुपये सभागृहात जाऊन आणले असते तर मी त्यांचा जाहीर सत्कार केला असता. 2014 ला मालवणमध्ये जी काम राहिली ती आजपर्यंत रेंगाळत राहिली. मच्छीमारांचे प्रश्न आहेत तसेच राहिले. उलट मच्छीमारांचे प्रश्न अजून वाढले.
राणेंनी मेडिकल कॉलेज आणलं म्हणून उद्धव ठाकरे यांनी राणेंचे मेडिकल कॉलेज चालू नये यासाठी सिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेज उभारलं. मात्र त्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये जनावर सुद्धा शिकू शकत नाही अशी स्थिती आहे असा टोला निलेश राणे यांनी लगावला.
साहेबांचा पराभव झाला तिथे निवडून यायचं आहे
नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी मला अनेकदा विचारलं की राज्यसभेवर किंवा विधानपरिषदेवर जाणार का? मी ते नाकारलं. जिथे माझ्या साहेबांचा पराभव झाला तिथेच मला निवडून यायचं आहे, म्हणून कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक लढतोय. मी कुणालाही हरवण्यासाठी आलेलो नाही. काहीतरी चांगलं करण्यासाठी आलो आहे.
पंधरा दिवसानंतर मीच निवडून येणार, निलेश राणेचा विश्वास
निलेश राणे कशातही सापडत नसल्यामुळे त्याला बदनाम केलं पाहिजे, त्याला कुठेतरी अडकवला पहिजे, त्याला भडकवलं पाहिजे. मात्र ते विसरलेत मला हल्ली रागच येत नाही असं निलेश राणे म्हणाले. येत्या 15 दिवसात निवडून येणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
ही बातमी वाचा: