Narayan Rane : सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Narayan Rane : भाजप खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी पाच प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारले आहेत.

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र सरकारच्यावतीनं काल पहिली पासून हिंदी शिकवण्या संदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यात आली. ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राज ठाकरे यांनी हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याच्या विरोधात 5 जुलैला मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार होते. तो मोर्चा पक्षविरहित असेल, असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, त्यापूर्वीच पहिली पासून हिंदी शिकवण्याचा निर्णय रद्द करणार अशी घोषणा सरकारनं केली. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेकडून पक्षविरहित विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यासंदर्भात प्रयत्न सुरु आहेत. यावर भाजप खासदार नारायण राणे आक्रमक झाले आहेत. नारायण राणे यांनी एक्स पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
विजयी मेळावा म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे?
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना 5 प्रश्न एक्स पोस्टमधून विचारले आहेत. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन ५ जुलैला विजयी मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता खासदार नारायण राणेंनी एक्स वर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे याचे मराठीचे प्रेम बेगडी, राजकीय व स्वार्थापोटी आहे. मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेले होते?
मराठी माणसाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले?
मराठीच्या नावावर केवळ आपले कल्याण करून घेतले.
मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय ?
महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये मराठी माणसाची टक्केवारी 18 टक्केपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण?
मराठी बद्दल इतकेच प्रेम होते तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले?
सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 30, 2025
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून जागांची चाचपणी सुरु
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारनं हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर विजयी मेळावा आयोजित करण्यासंदर्भात माहिती दिली होती. 5 जुलै रोजी मेळावा आयोजित केला जाईल असेल मात्र त्या मेळाव्यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल असं म्हटलं होतं. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवाजी पार्क किंवा वरळीच्या डोमच्या जागेची चाचपणी केली जात आहे.
























