Agriculture news : कणकवलीच्या पारंपारिक वांग्याला मिळाली हक्काची ओळख, 'कासरल वांगी' नावानं मिळालं पेटंट; शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश
Agriculture news : कासरल वांग्यांना केंद्र सरकारकडून पेटंट (Patent) मिळाले आहे. कासरल गावातील पाच शेतकऱ्यांना या वाणांचे 70 ते 75 वर्षांहून अधिक काळ संर्वधन केलं आहे.
Agriculture news : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कणकवली मधील वैशिष्ट्यपूर्ण पारंपारिक वांग्याच्या वाणाला आता हक्काची ओळख मिळाली आहे. कासरल वांग्यांना केंद्र सरकारकडून पेटंट (Patent) मिळाले आहे. कासरल गावातील पाच शेतकऱ्यांना या वाणांचे 70 ते 75 वर्षांहून अधिक काळ संर्वधन केलं आहे. त्यामुळं ही वांगी आता 'कासरल वांगी' नावानं ओळखली जाणार आहेत. या वांग्याच्या वाणाला पेटंट (Patent) मिळावे, यासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर केंद्र सरकारकडून पेटंटची (Central Govt) मान्यता देण्यात आली आहे.
कासरल गावातील अनिल सावंत, प्रल्हाद सावंत, दीपक सावंत, प्रवीण सावंत आणि अमोल सावंत या पाच शेतकऱ्यांनी 14 डिसेंबर 2020 ला आपल्या शेतकऱ्यांच्या समूहानं पेटंट मिळावे यासाठी वनस्पती जाती व शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरण नवी दिल्ली येथे अर्ज केला होता. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ही सर्व प्रकिया डॉ. व्ही. व्ही. दळवी यांनी पूर्ण केली होती. अखेर मे 2023 ला या पाच शेतकऱ्यांच्या समूहाला पेटंट मिळाल्याचे प्रमाणपत्र केंद्र सरकारकडून देण्यात आले.
कासरलमध्ये प्रत्येक शेतकरी करतो वाग्यांची लागवड
कासरल गावात प्रत्येक शेतकरी 20 ते 25 गुंठ्यांत कासरल वांग्याची लागवड करतो. या वागांच्या लागवडीचा कालावधी हा नोव्हेंबर ते डिसेंबर असतो. रोपे तयार केल्यानंतर 20 दिवसांनी लागवड होते. लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी कासरल वांग्याचं उत्पादन सुरु होतं. जानेवारी ते मे महिन्यात स्थानीक बाजारपेठेत कासरल वांगी बाजारपेठेत विकण्यासाठी आणली जातात. 60 ते 70 वर्षांपासून कासरल गावात वांग्याची लागवड केली जात आहे. आगामी काळात या वांगी वाणांचा अधिक प्रसार करून शेतकऱ्यांसाठी ते उपलब्ध करुन देण्याचा या शेतकऱ्यांचा मानस आहे.
कासरल वांग्याचे वेगळेपण काय?
या वांग्यांचा रंग हिरवा असतो आणि वरच्या कडेला पांढरा असतो.
एका वांग्याचे वजन 200 ग्रॅमपासून 500 ते 600 ग्रॅमपर्यंत असते.
झाडांची उंची चार फुटांपर्यंत असते.
वांग्याचा आकार गोल असून या वांग्यापासून भाजी, भरीत, तळून भजी करतात.
खर्च जाऊन एकरी 50 ते 60 हजार रुपयांचा नफा
कासरल वांगी नावाने स्वामित्व प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या वांग्याचा प्रसार, प्रचार आणि वांग्याची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. कासरल वांग्याचे उत्पादन देखील भरघोस प्रमाणात येत असल्यानं शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. एका एकरात कासरल वांग्याची लागवड केल्यास खर्च वजा करता शेतकऱ्यांना महिन्याला निव्वळ 50 ते 60 हजार रुपयांचा नफा मिळत आहे. सध्या कासरल वांग्याला स्थानिक बाजारपेठेत देखील मोठी मागणी आहे.
महत्त्वाच्या बातम्या: