(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Silicon Valley Bank : सिलिकॉन व्हॅली बँकेचे दिवाळं; इतर बँका वाचवण्यासाठी अमेरिका सरसावली
Silicon Valley Bank News : सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्यानंतर अमेरिकन प्रशासन आता इतर बँका वाचवण्यासाठी सरसावले आहे.
Silicon Valley Bank Latest Update : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक संकटाची लागण आता एखाद्या संसर्गाप्रमाणे इतर बँकांना होण्याची भीती आहे. अमेरिकेसह जगभरातील अनेक स्टार्टअप्सना त्याची झळ जाणवू लागली आहे. दरम्यान, लेहमन ब्रदर्सच्या संकटानंतर संपूर्ण बँकिंग जग हादरले होते. त्यामुळे 2008 च्या संकटाची पुनरावृत्ती होणार का? अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. ही बँक कोसळल्यानंतर जगभरात आर्थिक मंदीची लाट आली होती. अमेरिकेत याची सर्वाधिक झळ बसली होती. अशी परिस्थिती टाळण्यासाठी अमेरिकन सरकार आणि अधिकाऱ्यांनी पूर्व तयारी सुरू केली आहे. बँका बुडू नये आणि ठेवीदारांचे मोठे नुकसान होऊ नये यासाठीची तयारी करण्यात आली आहे.
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह आणि फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्प फंड तयार करण्यासाठी जोर देत आहेत. सिलिकॉन व्हॅली बँक कोसळल्यानंतर सध्या डळमळीत अवस्थेत असलेल्या बँकांकडे अधिक ठेवी ठेवण्यासाठी हा निधी वापरता येईल, असे नियामकांना वाटत आहे.
लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रयत्न
फेडरल रिझर्व्ह आणि फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्प सारख्या नियामकांचा असा विश्वास आहे की असा निधी तयार केल्याने लोकांमध्ये बँकिंग क्षेत्राबद्दल विश्वास कायम राहील. हे पाऊल बँकिंग व्यवस्थेवर ठेवीदारांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करेल आणि खातेदारांच्या मनात निर्माण झालेल्या भीतीची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल. यासाठी नियामकांनी बँकिंग जगतातील अनेक अधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे.
या बँकांची स्थिती वाईट?
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, सिलिकॉन व्हॅली बँकेच्या बुडण्यामुळे विशेषत: उद्यम भांडवल आणि स्टार्टअपवर लक्ष केंद्रित करणाऱ्या बँकांसाठी परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यामुळे अशा इतर बँकांनाही फटका बसत आहे. फेडरल रिझर्व्ह आणि फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे संक्रमण थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या प्रायोजकत्वासह, पर्यायी निधी योजना तयार केल्या जात आहेत.
बायडन यांनी घेतला आढावा
या प्रकरणाचे संभाव्य परिणाम पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनीदेखील याची माहिती घेतली आहे. बँक बुडल्याची बातमी कळल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूजम यांच्याशी चर्चा केली. दोघांनी SVB दिवाळखोरी प्रकरण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा केली असल्याची चर्चा आहे.