एक्स्प्लोर
'सामना जाळण्याची भाषा करणारे मनोरुग्ण', सेनेचं टीकास्त्र
मुंबई: शिवसेना आणि भाजपमधील वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. आशिष शेलारांनी सामना जाळण्याची भाषा केल्यांतर आज सामनामधून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झालं असून. सत्य सांगणाऱ्यांची मुस्कटदाबी दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत वाढत असल्याचं सामनामध्ये म्हटलं आहे.
सामना जाळण्याची भाषा करणारे मनोरुग्ण असल्याचं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे. सामना जाळण्याचा विचार म्हणजे हिंदुत्व जाळण्याचा विचार असल्याचंही सामनामधून म्हटलं आहे.
एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:
मनोरुग्णांचे मनोगत
> महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झाले आहे. टीकाटिपणी करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण सत्य सांगणार्यांची मुस्कटदाबी करण्याचे प्रकार दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत वाढू लागले आहेत. यालाच सत्ता डोक्यात जाणे असे म्हणतात. मानेवरचे मडके रिकामे असले की अशी हवा त्या पोकळीत शिरते व मग शब्दांऐवजी थुंकण्याचे प्रकार वाढतात. सूर्यावर थुंकण्याचे बालीश प्रकार गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू आहेत. थुंकणार्याच्या थोबाडावर ती थुंकी पडते व सूर्याचे तेज मात्र वाढतच जाते असे महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सांगतो. शिवसेना सूर्याच्या तेजाप्रमाणे तळपत आहे व ‘सामना’चे तेजही त्याच बरोबरीने वाढत आहे. शिवसेना व ‘सामना’ एकमेकांना पूरक आहेत व त्यांच्याशी बरोबरी कधीच कोणी करू शकले नाही ही अनेकांची पोटदुखी आहेच.
> ‘सामना’ जाळू असे मनोगतही यापैकी काही मनोरुग्णांनी व्यक्त केल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अग्निशमन दले सज्ज झाल्याच्या अफवा पसरवल्या आहेत. अफवांचा बाजार भरवून त्यांत स्वप्ने विकणार्यांची ही जमात असली तरी अफवा पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण यांचे सारे राजकारण अफवा आणि खोटेपणावर टिकून असल्याने ‘बंब’वाल्यांनी निर्धास्त असावे. कारण हे लोक स्वत:ची विडी पेटवायलाही दुसर्यांची पेटलेली विडी घेत असतात किंवा दुसर्यानी पेटवलेल्या आगीवर स्वत:च्या भाकर्या शेकवीत असतात. हा आजपर्यंतचा अनुभव असल्याने मनोरुग्णांच्या बेताल वक्तव्यांकडे दुर्लक्ष करणे हेच शहाणपणाचे धोरण असते व मनोरुग्ण जास्तच पिसाटले की, त्यांना मूर्खांच्या इस्पितळात दाखल करणे हेच समाजहिताचे असते.
> ‘सामना’ हा एक विचार आहे. कागद जळतो, विचार जळत नाही. ‘सामना’ जाळण्याचा विचार करणे म्हणजे ‘हिंदुत्व’ जाळणे. प्रखर राष्ट्रवाद, प्रभू श्रीराम, काशी, मथुरा आणि राष्ट्राची अस्मिता जाळणे, हिंदुस्थानचे स्वातंत्र्य व संविधान जाळणे. पण मनोरुग्णांना हे सर्व सांगायचे कोणी? मुंबईत बसून पिचलेल्या छातीत गॅसची हवा भरण्याने छाती फुगण्याऐवजी फुटू शकते याचे भान छाती फुगवणार्यांनी ठेवायला हवे. छाती पुढेच काढायची असेल तर कश्मीर खोर्यात जाऊन काढा. पाकव्याप्त कश्मीरात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जाळा.
> मोदी यांनी राष्ट्रभक्तीचा व राष्ट्रउभारणीचा जो विडा उचलला आहे त्या विड्यात शेंदूर कालवण्याचा हा प्रकार त्यांचेच लोक करीत असतील तर या अस्तनीतल्या दलालांना (निखार्यांचा अपमान नको) मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठेचले पाहिजे. मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. त्यांनी भ्रष्टाचार मोडण्याचे व गुन्हेगारी संपविण्याचे काम हाती घेतले आहे त्यामुळे स्वपक्षातील काही फडतूस लोकांचे धाबे दणाणल्याने मानसिक आजार बळावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीलाही सुरुंग लावण्याचे हे कारस्थान आहे. अर्ध्या महाराष्ट्रात आजही दुष्काळ व आत्महत्यांचे लोण आहे. चुली विझल्याच आहेत. त्या चुली पेटविण्याचे सोडून हे फडतूस लोक जाळपोळीची तोंडपाटीलकी करतात. हे मानसिक आजाराचे टोक आहे. ब्लॅकमेलिंग, दलाली, स्वैराचाराचे राजकीय कवच मिळवून ज्यांनी अंबारीत बसल्याचा आव आणला ते प्रत्यक्षात खेचरांवर किंवा गाढवांवरच बसले आहेत, पण मनोरुग्ण असल्यामुळे त्यांच्या हे लक्षात येईल असे वाटत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement