Phaltan Doctor Case: दिवाळीतील लक्ष्मीपुजनाचा दिवस; फोटो ठरलं कारण, बनकरच्या घरी वाद, डॉक्टर तरूणी हॉटेलवर जाण्याआधी काय घडलेलं?
Phaltan Doctor Case: पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर चाकणकरांनी डॉक्टर तरुणीच्या मृत्यूआधी नेमका कोणत्या गोष्टीवरून वाद झाला होता, याबाबतची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

सातारा: फलटणमधील डॉक्टर तरुणीने तळहातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याच्या (Phaltan Doctor Case) घटनेनं खळबळ उडाली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने चार वेळा बलात्कार केल्याचा (Phaltan Doctor Case) आरोप या तरुणीने सुसाईड नोटमध्ये केला आहे. तर एका तरुणाने आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा उल्लेखही तिने केला आहे. त्यामुळे मृत्यूपूर्वी तरुणीसोबत नेमकं काय घडलं होतं, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्याचबरोबर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस तपासाबाबत माहिती घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या काल (सोमवारी, ता २७) फलटणमध्ये दाखल झाल्या होत्या. पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर चाकणकरांनी डॉक्टर तरुणीच्या मृत्यूआधी नेमका कोणत्या गोष्टीवरून वाद झाला होता, याबाबतची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.(Phaltan Doctor Case)
Phaltan Doctor Case: घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं?
रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "घटना घडली त्यादिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता. तेव्हा डॉक्टर तरुणी ही प्रशांत बनकरच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी, लक्ष्मीपूजनासाठी होती. यावेळी फोटो काढण्यावरून वाद झाला, फोटो नीट आले नाहीत यावरून डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरसोबत वाद घातला. या वादाचं रुपांतर नंतर भांडणामध्ये झालं. या भांडणानंतर डॉक्टर तरुणी ही जवळच असलेल्या मंदिराजवळ गेली. तेव्हा प्रशांत बनकरच्या वडिलांनी डॉक्टरची समजूत घातली आणि तुम्ही इतक्या उशिरा मंदिराजवळ थांबू नका, असं सांगून त्यांना घरी आणलं. पण डॉक्टर तरुणी तिथून लॉजवर गेली. तेव्हाही डॉक्टरचे आणि प्रशांत बोलणे सुरू होते. रात्रभर तिने प्रशांत बनकरला मेसेज केले. प्रशांत बनकरचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झाला आहे," अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.
"लॉजवर गेल्यानंतर मी आत्महत्या करेन, असं म्हणत तरुणीने प्रशांत बनकरला फोटोही पाठवले आहेत. मात्र तू याआधीही मला अनेकदा अशी धमकी दिली आहे, असं प्रशांत बनकर तिला म्हणाला," असं दोघांच्या संभाषणावरून स्पष्ट झाल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या प्रकरणातील गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर हे दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
Gopal Badne : आरोपी पीएसआय गोपाल बदने याने आपला मोबाईल लपवला
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदने याने आपला मोबाईल लपवला असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना शरण येण्यापूर्वी गोपाळ बदने याने त्याचा मोबाईल लपवला. पीएसआय गोपाळ बदनेच्या मोबाईलचा शोध पोलीस घेत आहेत. गोपाळ बदने पोलिसांकडून मोबाईल कोठे आहे याची माहिती लपवत आहे. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेला पीएसआय गोपाल गोपाळ याचा मोबाईल आहे. तर दोन्ही आरोपीं महिला डॉक्टरच्या संपर्कात असल्याची कबुली पोलिसांना देखील दिली आहे. प्रशांत बनकर डॉक्टर महिलेच्या आत्महत्या करण्यापूर्वी देखील संपर्कात होता डिजिटल पुरावे शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी प्रशांत बनकर याला काही वेळा न्यायालयात हजर करणार आहेत.
























