(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : मीडियाला हात जोडून सीएम एकनाथ शिंदे दरे गावातून मुंबईच्या दिशेने रवाना, आता थेट दिल्ली गाठणार?
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावात आले असता ते तातडीने हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी थेट हात जोडत पत्रकारांशी संवाद साधण्यास नकार दिला आहे.
Eknath Shinde : आज भाजपची (BJP) केंद्रीय निवड समितीची बैठक दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे मुंबईवरून दिल्लीला दाखल झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देखील दिल्लीला बोलावून घेतल्याची माहिती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. भाजपकडून महाराष्ट्रात याआधी 48 पैकी 20 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र महायुतीत उर्वरित जागांवरून तिढा अद्याप कायम आहे.
दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील महायुतीचे उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. मनसेच्या जागांच्या मागणीवर राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केली आहे. मनसेला नेमक्या कोणत्या जागा द्यायच्या, तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला कोणत्या जागा सोडायच्या यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आजच्या बैठकीत आहे.
मीडियाला हात जोडून एकनाथ शिंदे मुंबईला रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावात आले असता ते तातडीने हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट हात जोडत पत्रकारांशी संवाद साधण्यास नकार दिला. आजच्या महायुतीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे मुंबईहून आता थेट दिल्लीला जाणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महायुतीत कुणाला किती जागा मिळणार?
दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीत मतदारसंघांच्या जागावाटपावर अंतिम निर्णय झाला तर येत्या दोन-तीन दिवसात महायुतीचे उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आता शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मनसे जर महायुतीत सहभागी झाली तर तीनही पक्षांना किती जागा मिळणार? भाजप किती घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा