(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde In Satara: गावकऱ्यांच्या विनंतीला मान देत मुख्यमंत्र्यांनी घेतली वृद्ध दाम्पत्याची भेट; दिलं मदतीचं आश्वासन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने जात असताना पिंपरी हे गाव लागले. या ठिकाणी विठ्ठल गोरे यांच्या घराजवळ मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबला. यावेळी त्यांनी गोरे यांच्या अंगणात बसून कुटुंबाची विचारपूस केली.
CM Eknath Shinde In Satara: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसापासून त्यांच्या साताऱ्यातील (Satara News) दरे या त्यांच्या गावी मुक्कामी आले होते. वातावरणातील बदलामुळे ते हेलिकॉप्टरने न जाता कारने मुंबईला रवाना झाले. यावेळी त्यांनी जाता जाता गावकऱ्यांनीन केलेल्या विनंतीला मान देत वृद्ध दाम्पत्याची भेट घेत मदतीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने जात असताना पिंपरी हे गाव लागले. या पिंपरी गावानजीक असलेल्या भागडी या ठिकाणी विठ्ठल गोरे यांच्या घराजवळ मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबला. यावेळी त्यांनी गोरे यांच्या अंगणात बसून कुटुंबाची विचारपूस केली. तसेच या कुटुंबाला लागणाऱ्या दैनंदिन जीवनातील वस्तूंची पूर्तता केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा एक आगळावेगळा स्वभाव उपस्थितांना अनुभवायला मिळाला. यावेळी विठ्ठल गोरे भारावून गेले होते.
कोण आहेत विठ्ठल गोरे?
विठ्ठल गोरे हे वृद्ध दाम्पत्य आहे. या दोघांना मूलबाळ नाही. वयोवृद्ध दाम्पत्याला सध्या सांभाळ करण्यास कोणीही नाही. तसेच ते राहत असलेल्या घराची सुद्धा पडझड होत चालली आहे. ही बाब काही ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली. त्यामुळे त्यांनी आपला ताफा महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रोडकडे न वळवता विरुद्ध दिशेला असलेल्या पिंपरी गावापर्यंत नेला. त्या ठिकाणी कुटुंबाची व्यथा समजून घेत या सर्वातोपरी मदत करण्याचं जाहीर केलं.
मुख्यमंत्री रमले शेतात
दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतात पत्नीसह केळीची लागवड केली. त्यांनी पाच हजार केळींच्या झाडांची लागवड केली. तसेच नारळाच्या झाडांची देखील लागवड केली. मला शेतीची आवड आहे. मी प्रत्येक वेळी आलो की झाडे वाढवतो असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्नी लताताई शिंदे या देखील शेतात उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मला शेतीची आवड आहे. मी हमेशा शेताकडे येत असते. गेल्या वेळेस हळदीच्या झाडांची लागवड केली होती. यावेळेस केळीच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. माझ्या मुलाला तसेच साहेबांना देखील शेतीची आवड असल्याची माहिती लताताई शिंदे यांनी दिली.
विविध प्रकारच्या फळांची लागवड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे या गावी शेती आहे. दरे हे सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोर्यातील डोंगरांमध्ये आणि कोयना धरणाच्या काठावर वसलेलं आहे. या शेतामध्ये त्यांनी आंबा, चिकू, स्ट्रॉबेरी, मोसंबी, सफरचंद, नारळ, केली या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी ते गावातील शेतीत रमतात. आपल्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीत लक्ष घालून त्यांनी आपली शेती चांगल्या पद्धतीने विकसित केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या