Sangli Crime: सांगली : दोन घटनांनी मिरज हादरलं! जेवणाच्या वादातून बायकोने नवऱ्याला संपवलं, मुलाने बापाला ट्रॅक्टरखाली चिरडले
मिरज तालुक्यातील एरंडोलीमध्ये बायकोनेच नवऱ्याचा चाकूने भोसकून खून केल्याची, तर बेडगमध्ये वडिलांनी उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून पोटच्या नराधम लेकाने ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केल्याची घटना घडली
Sangli Crime: सांगली जिल्ह्यातील (Sangli News) मिरज तालुक्यात (Miraj) दिवसाढवळ्या रक्ताच्या नात्यामधील क्रौर्याची परिसीमा दाखवणाऱ्या दोन खुनांची नोंद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिरज तालुक्यातील एरंडोलीमध्ये बायकोनेच नवऱ्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली. नवऱ्याला भोसकून संशयित बायको फरार झाली आहे. अन्य एका घटनेत बेडगमध्ये वडिलांनी उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून पोटच्या नराधम लेकाने ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केल्याची घटना घडली. निर्दयी मुलाला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
वडिलांना ट्रॅक्टरखाली चिरडून मारले
आज (24 मे) बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बेडगमध्ये घडलेल्या घटनेत दाजी गजानन आकळे (वय 70 रा. मालगाव रस्ता, बेडग ता. मिरज, जि. सांगली) यांचा मुलगा लक्ष्मण आकळे याने ट्रॅक्टर अंगावर घालून चिरडले. यात दाजी आकळे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित लक्ष्मणला तातडीने ताब्यात घेतले आहे. मृत दाजी आकळे आणि संशयित मुलगा लक्ष्मण आकळे हे पिता-पुत्र असून दोघांमध्ये वाद सुरु होता. वडिलांकडे पैसे आणि शेतजमीन नावे करून दे यासाठी लक्ष्मणने तगादा लावला होता. तसेच सातत्याने पैशांची मागणी करत होता. मात्र, मृत वडिल दाजी आकळे पैसे देण्यास अथवा जमिन नावावर करून देण्यास राजी नव्हते. यातून दोघांमध्ये सातत्याने वाद सुरु होता. यातून चिडलेल्या संशयित लक्ष्मणने वडिलांना ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले.
बायको नवऱ्याला भोसकून फरार
दरम्यान, ही भयंकर घटना ताजी असतानाच दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पती पत्नीमध्ये जेवण करण्यावरून झालेल्या वादात पत्नीने पतीवर चाकूने वार करून खून केल्याची घटना एरंडोली येथील पारधी बेघर वस्तीवर घडली. या घटनेनंतर महिला फरार झाली आहे. पारधी वस्तीवर राहणारा सुभेदार आनंदराव काळे (वय 45) आणि पत्नी चांदणी काळे यांच्यात जेवण करण्यावरून वाद झाला. या वादात महिलेने चाकूने पतीच्या छातीवर वार केले. यात तो जागीच ठार झाला. या दोन्ही घटनांची मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. फरार झालेल्या महिलेच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असल्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या