Sanjay Raut on Sangli Loksabha : विश्वजित कदम आणि काँग्रेसचा नाराजीचा सूर थांबेना; संजय राऊतांचा सांगलीतून गंभीर इशारा!
मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करणार असाल तर त्याची लोन राज्यातील 48 जागांवर पसरेल असा इशारा संजय राऊत यांनी आज सांगलीमधून (Sangli News) बोलताना दिला.
सांगली : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपामध्ये ज्या जागांवर समाधानकारक तोडगा निघालेला नाही त्याठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची भाषा काँग्रेसने (Cognress) करू नये, असा गर्भित इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला. जर मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करणार असाल तर त्याची लोन राज्यातील 48 जागांवर पसरेल असा इशारा संजय राऊत यांनी आज सांगलीमधून (Sangli News) बोलताना दिला. राऊत सांगली दौऱ्यावर असून त्यांनी सांगलीच्या जागेवरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले.
पुन्हा भाजप सत्तेत येणार नाही हा जनतेचा मानस
ते म्हणाले की, सांगली लोकसभेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे काय होणार याची चर्चा रंगली आहे. सांगलीतून शिवसेनेचे चंद्रहार पाटील दिल्लीत जाणार असल्याचे राऊत म्हणाले. त्यांनी सांगितले की, मविआ सरकार पाडल्याने सगळीकडे रोष आहे. दरम्यान, राऊत यांनी भाजपकडून सुरू असलेल्या 400 पारच्या नाऱ्यावर सुद्धा खोचक शब्दात टीका केली. 400 पारचा नारा फसवा असून भंपक आहे हे निकालानंतर कळेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नसल्याचे ते म्हणाले. पुन्हा भाजप सत्तेत येणार नाही हा जनतेचा मानस असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील कामगिरीवर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की महाराष्ट्रामधील 48 पैकी 35 जागा आम्ही जिंकणार आहोत. ते म्हणाले आघाडीत किंवा युतीत एखाद्या जागेवर वाद होतोच. सांगलीतील काँग्रेस नेत्यांची एक वेगळी भूमिका आहे. त्या भूमिकेचं आम्ही आदर करतो, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लढावी ही चर्चा झाल्याचे संजय राऊत म्हणाले.
विश्वजित कदम आणि विशाल पाटील महत्त्वाचे नेते
विश्वजित कदम आणि विशाल पाटील महत्त्वाचे नेते असल्याचे ते म्हणाले. सरकारमध्ये विश्वजित कदम अग्रेसर होते. विशाल पाटील यांना राजकीय भविष्य चांगलं असल्याने शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसमधील काही जागांवर अशोक चव्हाणांमुळेच वाद निर्माण झाल्याचे काही काँग्रेस नेत्यांनी आरोप केला आहे. या संदर्भात बोलताना राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की मविआमध्ये काही जागांवर पेच निर्माण झाला आहे, याबद्दल मी कोणालाही जबाबदार धरणार नाही. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर त्यांना विचारले असता ते त्यांच्या हायकमांकडे गेले असतील असे उत्तर दिले.
इतर महत्वाच्या बातम्या