Sangli News: शिराळा तालुक्यातील वारणावती वसाहतीत पुन्हा बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण
Sangli News: गेल्या काही दिवसांपूर्वी अमीन गुड्डापुरे यांच्या घराजवळ पाळीव कुत्र्याला बिबट्याने भक्ष्य केले होते. त्यावेळी सीसीटीव्हीत कॅमेरात बिबट्या कैद झाला होता.
सांगली : जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणावती येथील नागरी वसाहतीमध्ये दोन दिवसांपूर्वी करमणूक केंद्राजवळ संध्याकाळी सहाच्या सुमारास झाडावर मुक्तपणे वावरताना येथील नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. आता पुन्हा तोच बिबट्या येथील बसस्थानक परिसरात संध्याकाळी नऊच्या सुमारास स्थानिक नागरिकांना दिसून आला. गेल्या काही दिवसांपूर्वी येथील अमीन गुड्डापुरे यांच्या घराजवळ पाळीव कुत्र्याला बिबट्याने भक्ष्य केले होते. त्यावेळी येथील सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या कैद झाला होता. त्यामुळे वसाहतीत बिबट्याचं वास्तव्य असल्याचे सिद्ध झाले होते. आता तर वारंवार या बिबट्याचे नागरिकांना दर्शन होऊ लागले आहे.
परिसरातील भटकी कुत्रीही गायब
बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरातील भटकी कुत्रीही गायब झाली आहेत. वारणावती वसाहत सध्या निर्मनुष्य झाली आहे. मोजकेच कर्मचारी येथे वास्तव्यास असल्यामुळे वसाहतीची दुरावस्था झाली आहे. झाडाझुडपांचं साम्राज्य वाढलं आहे. बिबट्याला तसेच वन्य प्राण्यांना लपण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे वारंवार येथे गवे, बिबटे यांचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे या बिबट्यांचे आश्रयस्थानच वारणावती वसाहत बनू लागली आहे. शनिवारी संध्याकाळी नऊच्या सुमारास वसाहतीतील बसस्थानक परिसरात परवाचाच बिबट्या पुन्हा नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यामुळे नागरिकांना आता परिसरात वावरणे कठीण झाले आहे. वारंवार वसाहतीमधील वीजपुरवठाही खंडित झालेला असतो. त्यामुळे या अंधाराचा नागरिकांना धोका संभवतो, संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातही बिबट्याचा वावर
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्यामध्ये (Panhala) बिबट्याने मध्यरात्री घुसून दोन कुत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न मागील महिन्या केला होता. मात्र, कुत्र्यांनी एकाचवेळी प्रतिकार केल्याने बिबट्याने धूम ठोकली. कुत्र्यांनी प्रतिकार करताना आवाज आल्याने बंगल्याचे मालक डॉ. राज होळकर यांनी लाईट लावल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली. होळकर यांचा तबक उद्यानाच्या बाजूला बंगला आहे. या बंगल्यामध्ये मध्यरात्री बिबट्याने दोन कुत्र्यांवर हल्ला केला. एका कुत्र्याने प्रतिकार केल्याने या बिबट्या पळाला. हा सगळा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला होता. दोन वर्षापूर्वी सुद्धा बिबट्याने या बंगल्यात प्रवेश केला होता. त्यांच्या आजवर अनेक पाळीव कुत्र्यांची शिकार बिबट्याने केली आहे. मध्यरात्री बिबट्याने डॉ. होळकर यांच्या बंगल्यात घरात शिरून दोन कुत्र्यांवर हल्ला केला. परंतु डॅंगो नावाच्या पाळीव कुत्र्याने त्याला प्रतिकार केला. डॉ. होळकर यांना याची चाहूल लागताच लाईट लावून ते बाहेर आल्यामुळे बिबट्या पळून गेला.
इतर महत्वाच्या बातम्या