Maharashtra Kesari : वाद टाळण्यासाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीत भरवण्याचा मानस, विजेत्या मल्लास एक कोटीचं बक्षीस : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील
सांगलीत विना वादविवाद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याची तयारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दर्शवली आहे. तसंच विजेत्या पैलवानाला एक कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाईल असंही त्यांनी म्हटलं. ते एबीपी माझाशी बोलत होते.
Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि वाद हे काही नवीन नाही. यंदाची महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धा देखील वादामुळेच जास्त चर्चेत होती. सोलापूरचा पैलवान सिकंदर शेखवर (Sikandar Shaikh) अन्याय झाल्याचं सोशल मीडियावर म्हटलं गेलं आणि वादाला आणखी हवा मिळाली. परंतु डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाशिवाय कशी पार पाडता येईल, याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. सांगलीत विना वादविवाद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याची तयारी चंद्रहार पाटील यांनी दर्शवली आहे. तसंच विजेत्या पैलवानाला एक कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाईल असंही त्यांनी म्हटलं. ते एबीपी माझाशी बोलत होते.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत भरवण्यास परवानगी देण्याची मागणी करत विजेत्या मल्लास तब्बल एक कोटी रुपयांचं बक्षीस देणार असल्याचंही चंद्रहार पाटील यांनी जाहीर केलं. शिवाय कुस्ती क्षेत्रातील लोकांकडून पैलवानांवर अन्याय सुरु आहे आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवानांवर अन्याय होत आला आहे, असा आरोपही डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केला आहे.
कुस्तीचा सांगली पॅटर्न महाराष्ट्रात सुरु होईल : चंद्रहार पाटील
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये होत असलेले वाद हे कायमस्वरुपी टाळण्यासाठी सांगलीमध्ये यंदाची 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धा भरवण्याचा आपला मानस असून या स्पर्धेसाठी एक कोटींचे बक्षीस देखील आपली देण्याची तयारी असल्याचं डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी जाहीर केलं आहे. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा सांगलीत झाल्या तर त्या विनातक्रार आणि वादाशिवाय होऊ शकतात. या कुस्ती स्पर्धा यशस्वी करुन दाखवून देऊ. त्यानंतर कुस्तीचा सांगली पॅटर्न महाराष्ट्रात सुरु होईल असा विश्वास देखील पैलवान चंद्रहार पाटलांनी व्यक्त केला आहे.
'आता कोणत्याही पैलवानावर अन्याय करु नका'
तसंच महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवानांवर अन्याय होत आला आहे, असा आरोपही चंद्रहार पाटील यांनी केला आहे. "पैलवानावर आज अन्याय झाल्यास तो आत्महत्यापर्यंत जातो. मी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माझ्यावर झालेल्या अन्यायानंतर आत्महत्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो, मात्र त्यातून सावरलो आहे. पण 'ज्या' चार लोकांनी माझ्या अन्याय केला त्यांना माझं सांगणं आहे की कोणत्याही पैलवानावर आता अन्याय करु नका," असं देखील पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले.
हेही वाचा
Sikandar Shaikh : पैलवान सिकंदर शेखनं मारलं 'विसापूर केसरी'चं मैदान, पंजाबच्या पैलवानाला केलं चितपट