(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : विजेच्या धक्क्याने 'महावितरण'च्या कंत्राटी वायरमनचा मृत्यू, आष्टामधील महिनाभरातील दुसरी दुर्घटना
Sangli News : विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढलेल्या कंत्राटी वायरमनचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सांगलीतील आष्टामध्ये घडली आहे. विजेचा धक्का लागल्यानंतर खांबावरील वायरींच्या जाळ्यात मृतदेह लटकलेल्या स्थितीत राहिला होता.
Sangli News : विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढलेल्या कंत्राटी वायरमनचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सांगलीतील (Sangli) आष्टामध्ये घडली आहे. अजित बनसोडे असे मृत झालेल्या वायरमनचे नाव असून तो वाळवा तालुक्यातील भडकंबे गावचा आहे. विजेचा धक्का लागल्यानंतर खांबावरील वायरींच्या जाळ्यात मृतदेह लटकलेल्या स्थितीत राहिला होता. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर पोलीस आणि 'महावितरण'च्या (MSEDCL) कर्मचाऱ्यांनी मृतदेह खाली घेतला.
महिनाभरापूर्वीच आष्टामधीलच अंबाबाई मंदिरानजीक एका वीज कर्मचाऱ्याचा रात्री काम करताना मृत्यू झाला होता. आता अजित बनसोडे यांच्यानिमित्ताने आणखी एका वीज कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने या वीज कर्मचाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी अधिकारी वर्गाची भूमिका बेजबाबदार असल्याची परिस्थिती आहे.
अजित बनसोडे हे आष्टा विभागात आठ वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी होते. काल (4 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास बनसोडे हे बस स्थानक चौकातील वीजपुरवठा खंडित झाला होता तो पूर्ववत करण्यासाठी गेले होते. खांबावर चढून दुरुस्ती करत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने अजित खांबाला चिकटले. शरीरातून वीजप्रवाह प्रवाहित झाल्याने त्यांनी जागीच प्राण सोडले.
विजेच्या धक्क्याची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलीस, 'महावितरण'चे कर्मचारी दाखल झाले. क्रेन, अग्निशमन गाडीतील दोरीच्या सहाय्याने 'महावितरण'च्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह खाली घेतला. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले.
अजित याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. ते घरचे कुटुंबप्रमुख होते. त्यांच्या वडिलांचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले. आई, पत्नी, चार वर्षे आणि दीड महिन्याची मुलगी अशी दोन अपत्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती. आज घरचा पोशिंदाच मृत झाल्याने भडकंबे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
दरम्यान शहरातील अनेक खांबावरील विद्युतप्रवाह असणाऱ्या तारा कालबाह्य झाल्या आहेत. 'महावितरण'चे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत महावितरण अधिकाऱ्यांचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे.