(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : एसटी ड्रायव्हर पतीच्या सुट्टीसाठी आगारात झोपून आंदोलन करणाऱ्या पत्नीवर गुन्हा दाखल!
एसटी चालक पतीला सुट्टी देण्यात येत नसल्याने संतप्त झालेल्या पत्नीने सांगलीच्या आटपाडी एसटी आगाराविरोधात झोपून आंदोलन केलं. आगार प्रमुखांच्या केबिनसमोर अंथरून टाकत झोपत पत्नीने निषेध केला होता.
Sangli News : एसटी चालक पतीला सुट्टी देण्यात येत नसल्याने संतप्त झालेल्या पत्नीने सांगलीच्या आटपाडी एसटी आगाराविरोधात झोपून आंदोलन केलं. आगार प्रमुखांच्या केबिनसमोर अंथरून टाकत झोपत पत्नीने निषेध केला. न्याय हक्कासाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर एसटी प्रशासना जाग आली. मात्र, प्रशासनाने त्या पत्नीवर प्रशासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
एसटी चालक विलास कदम यांच्या पत्नी नलिनी कदम यांनी थेट आगारप्रमुखांच्या दालनासमोर अनोख्या पद्धतीचे आंदोलन केल्यानंतर आटपाडी एसटी प्रशासनाला खडबडून जाग आली. सर्वच अधिकाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या कदम यांची भेट घेतली. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या रजेसाठी आंदोलन करणाऱ्या नलिनी कदम यांच्या विरोधात आटपाडी एसटी आगाराकडून आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सांगलीच्या आटपाडी आगारात चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या विलास कदम यांना सुट्टी देण्यात आली नाही. 12 आणि 13 मार्च रोजी त्यांनी आपल्या पत्नीच्या आजाराच्या उपचारासाठी सुट्टी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली. त्यामुळे विलास कदम यांना ड्युटीवर जावं लागलं, पण पत्नीच्या उपचाराचा प्रश्न तसाच राहिला. पती ड्युटीवर गेल्यावर संतप्त झालेल्या पत्नीने एसटी आगार विरोधात आंदोलन केलं. एसटी आगारप्रमुखांच्या दालनासमोर जाऊन एसटी चालक पत्नी नलीनी कदम यांनी अंथरून पांघरुन झोपून आंदोलन करत एसटी प्रशासनाचा निषेध नोंदवला.
काय आहे प्रकरण?
विलास कदम हे गेल्या 33 वर्षांपासून एसटीत चालक म्हणून सेवा बजावत आहेत. 70 दिवसांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. आजअखेर त्यांची 270 दिवस रजा शिल्लक आहे. आजारी पत्नीला बाहेरगावी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 12 मार्च आणि 13 मार्च अशा दोन दिवसाच्या रजेसाठी त्यांनी आगार प्रमुखांकडे 6 मार्च रोजी अर्ज केला होता. मात्र एसटी प्रशासनाने त्यांना सुट्टी नाकारत त्यादिवशी आटपाडी-इचलकरंजी ही ड्युटी असल्याचे कारण दिले. रविवारी (12 मार्च) सकाळी चालक कदम आणि त्यांची पत्नी नलिनी कदम आटपाडी आगारामध्ये आले होते. यावेळी सुरक्षारक्षकाने चालक कदम यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही माझी पत्नी असल्याचे सांगितले. यावेळी नलिनी कदम या एका झाडाखाली बसल्या होत्या. दरम्यान चालक कदम हे त्यांना दिलेली आटपाडी इचलकरंजी गाडी घेऊन सेवेवर गेले. सुरक्षारक्षक गेटवर कामात व्यस्त असताना नलिनी यांनी आगार प्रमुखांची केबिन गाठत बंद केबिनसमोर अंथरुण पांघरुण टाकत आंदोलन सुरु केले.