Sangli News : बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करुन मुला-मुलींना एकांत मिळण्यासाठी प्रवेश, इस्लामपूरमध्ये सात कॉफी शॉपवर कारवाई
Sangli News : सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूर शहरातील सात कॉफी शॉपवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कॉफी शॉपमध्ये बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करुन शाळा कॉलेजच्या मुला-मुलींना एकांत मिळण्यासाठी प्रवेश दिला जात होता.
सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्याच्या इस्लामपूर शहरातील सात कॉफी शॉपवर (Coffee Shop) पोलिसांनी छापा टाकून या कॉपी शॉप मालकांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी सात कॉफी शॉप मालकांविरुद्ध गुन्हा देखील नोंद केला आहे. या कॉफी शॉपमध्ये बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करुन शाळा कॉलेजच्या मुला-मुलींना एकांत मिळण्यासाठी प्रवेश दिला जात होता. इथे असभ्य वर्तन/अश्लील चाळे सुरु असल्याची तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
बंदिस्त कम्पार्टमेंटमध्ये असभ्य वर्तन सुरु असल्याने कारवाई
संबंधित कॉफी शॉप मालकांनी या शॉपमध्ये बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करुन त्यामध्ये शाळा कॉलेजच्या मुला-मुलींना प्रवेश दिला जात होता. शॉपमधील हे कम्पार्टमेंट हे तासावर भाड्याने दिले जात होते. त्यामुळे मुले-मुली कॉफी शॉपमध्ये येतात आणि याठिकाणी असभ्य वर्तन केले जात असल्याची तक्रार पोलिसांनी आली होती. त्यानुसार परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकासह पोलीस पथकाने छापा टाकला होता.
'या' कॉफी शॉपवर कारवाई
यात इस्लामपूर पोलीस ठाण्याकडील सात पथकांनी इस्लामपूर शहरातील लोबर्ड कॉपी शॉप, डिस्टेनेशन कॉपी शॉप, रेड ब्लू, गोल्डन कॉपी शॉप, पिंक क्रश, ओपन बुक कॉपी शॉप, पिझा हट कॉपी शॉप अशा सात कॉफी शॉपवर छापे टाकले होते. या छाप्यामध्ये जवळपास 18 मुले-मुली असभ्य वर्तन करत असताना आढळून आले होते. त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम कलम 110 112 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. तसंच मुला मुलींना समुपदेशन करुन ताकीद देऊन सोडून दिले आहे.
कॉफी शॉप मालकांना सूचना
या कारवाईनंतर पोलिसांनी कॉपी शॉप मालकांना हे शॉपमधील कम्पार्टमेंट हे बंदिस्त न ठेवता ते सहजपणे दिसेल आणि लाईटचा प्रकाश असेल अशी रचना करुन घेण्याबाबत सूचना करण्यात आली. तसेच जे कॉफी शॉप मालक अल्पवयीन मुला मुलींना प्रवेश देतील आणि अशी मुले मुली असभ्य वर्तन करताना आढळून आले तर अशा शॉप मालकांवरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसंच यापुढेही अशीच कारवाई सुरु ठेवली जाणार आहे.
हेही वाचा
Latur Crime : नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 24 कॉफी शॉप चालकांवर गुन्हे दाखल, लातूर पोलिसाची कारवाई