Sangli Crime : 'मास्तर'ही आता शेअर मार्केटच्या नावाखाली गंडा घालू लागले; लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षक निलंबित!
फसवणुकीविरोधात रुपेश दत्तात्रय काळे (रा. कोल्हापूर) यांनी यासंदर्भातील तक्रार सांगली जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यानंतर या तक्रारीची गंभीर दखल घेत स्थानिक चौकशी अहवाल मागविण्यात आला होता.
सांगली : दामदुपट्ट परतावा आणि शेअर मार्केटच्या (Share Market) नावाखाली राज्यात फसवणुकीचा धमाकूळ सुरू असतानाच आता या यादीमध्ये चक्क ज्ञान देण्याचं काम करणाऱ्या शिक्षकाची (Primary Teacher) भर पडली आहे. शेअर मार्केटमध्ये व्यवहारासाठी कंपनी स्थापन करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपातून सांगली (Sangli News) जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ठोंबरेवाडीमधील प्राथमिक उपशिक्षक अनिल केराप्पा लांडगे यांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ही कारवाई केली.
लांडगे यांनी केलेल्या फसवणुकीविरोधात रुपेश दत्तात्रय काळे (रा. कोल्हापूर) यांनी यासंदर्भातील तक्रार सांगली जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यानंतर या तक्रारीची गंभीर दखल घेत स्थानिक चौकशी अहवाल मागविण्यात आला होता. चौकशी चौकशी समितीने केलेल्या चौकशीनंतर लांडगे याांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. या चौकशी समितीमध्ये कडेगाव खानापूरचे गटशिक्षण अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या समावेश होता.
समितीकडून बेशिस्तीचा फटका
लांडगे यांनी पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने तक्रारदार रुपेश काळे यांची फसवणूक केली होती. पंढरपूर तालुक्यातील अभिजीत देशमुख यांनाही फसवलेली तक्रार आहे. त्यांनीही कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवण्यात आली आहे. समितीने त्यांच्यावर बेशिस्तीचा ठपका ठेवला आहे. कार्यालयीन तसेच शालेय कामकाजामध्ये अनियमतता केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, त्यामुळे निलंबनाचे आदेश काढण्यात आले.
तीन कंपन्यांच्या माध्यमातून फसवणूक
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक अनिल लांडगे यांनी शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी पत्नी आणि नितीन शिवाजी कारंडे (रा. आटपाडी) यांच्या मदतीने कंपन्या स्थापन केल्या होत्या. शेअर मार्केट संदर्भात मराठी ट्रेडर्स अॅन्ड फायनान्सियल सोल्यूशन एल. एल. पी., पैशाचं झाड प्रा. लि. कंपनी व PINTEXIM GLOBAL PRODUCTS PRIVATE LIMITED अशा तीन कंपन्या स्थापन केल्याचे स्पष्ट झालं आहे. अभिजीत देशमुख यांनी वकिलाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक व गैरवर्तनाच्या कारणास्तव नोटीस धाडली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या