(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Jat Water Issue : जत पाणी संघर्ष समिती करणार दंडवत आंदोलन, कर्नाटकात सामील करुन घेण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा
Sangli News : जत पाणी संघर्ष समितीचे सदस्य 25 ऑगस्ट रोजी कर्नाटकात सामील करुन घेण्यासाठी दंडवत आंदोलन करणार आहेत.
सांगली : जत (JAT) पाणी संघर्ष समितीच्या सदस्यांनी पाणी प्रश्नावरुन पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्नाटकात सामील करुन घेण्यासाठी जत पाणी संघर्षच्या समितीकडून 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर (Maharashtra karnataka Border) दंडवत आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आल्याची भावना पाणी समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र सरकराच्या दारी अनेकदा आंदोलन
जतमधील विस्तारित सिंचन योजनेच्या कामाला अजूनही सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे या टेंडर कामाची लवकर सुरुवात करुन उर्वरित कामासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सातत्याने करण्यात येत होती. त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या दारी अनेकदा आंदोलन देखील करण्यात आली. परंतु त्याकडे महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं पाणी संघर्ष समितीचं म्हणणं आहे. त्यामुळे 25 ऑगस्ट रोजी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य सीमेवर पाणी समितीचे शेकडो कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. तसेच कर्नाटक सामील करुन घेण्यासाठी कर्नाटक सरकारला साकडं देखील घालणार आहेत.
रास्ता रोको आंदोलन देखील करणार
हे दंडवत आंदोलन झाल्यानंतर जत पाणी संघर्ष समितीकडून रास्ता रोको देखील करण्यात येणार आहे. उमदी बस स्थानकाजवळील नगर विजयपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. जत तालुक्याच्या पाणी संघर्ष समितीच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरकाराने लवकरात लवकर पाणी प्रश्नाची गंभीर दखल घेण्याची मागणी पाणी संघर्ष समितीच्या सदस्यांकडून करण्यात येत आहे.
जर लवकरात लवकर सरकारने गंभीर दखल घेतली नाही तर मात्र 25 ऑगस्टच्या आंदोलनावर हे सदस्य ठाम आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडे आम्ही कोणतीही मागणी करणार नसल्याचं सदस्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच त्यानंतर आम्ही फक्त कर्नाटकात जाण्यावर ठाम राहणार असल्याचं मत देखील या सदस्यांनी व्यक्त केलं आहे.
कानडीत फलक लावण्याचा पाणी समितीचा इशारा
दरम्यान पाणी संघर्ष समितीकडून जत तालुक्यामध्ये कानडीमधून फलक लावण्याचा देखील इशारा महाराष्ट्र सरकारला देण्यात आला आहे. त्यामुळे आता तरी सरकार जत तालुक्याच्या पाणी प्रश्नाची गांभीर्याने दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच जतच्या पाणी प्रश्नावर महाराष्ट्र सरकारकडून तोडगा निघणार का की कर्नाटकात समील होणार हे पाहणं गरजेचं आहे.