Sangli : सांगली आणि खानापूरमध्ये बंडखोरी, महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं
Sangli Vidhan Sabha Election : सांगलीत काँग्रेसमध्ये जयश्री पाटील यांनी तर खानापूरमध्ये शरद पवार गटाच्या राजेंद्र देशमुखांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे दोन्ही विधानसभेतील उमेदवाराचे टेन्शन वाढले.
सांगली : जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघापैकी दोन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी झालेली आहे. यामध्ये सांगली विधानसभेत काँग्रेसमधून जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी कायम ठेवलीय. तर खानापूर विधानसभेमधून शरद पवार गटातून आटपाडीच्या राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आपला अपक्ष उमेदवार अर्ज ठेवलाय. त्यामुळे सांगली आणि खानापूर या दोन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीसमोर बंडखोर उमेदवारांचं आव्हान आहे.
सांगलीमधून जयश्री पाटलांची बंडखोरी
सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाली. काँग्रेसमधीलच गट असलेल्या जयश्री पाटीलदेखील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. त्यांनीदेखील पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पृथ्वीराज पाटील यांना तिकीट जाहीर होताच जयश्री पाटील यांनी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं जाहीर केलं होतं आणि आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला.
सांगली विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवारासमोर भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्याबरोबरच काँग्रेसमधीलच अपक्ष असलेल्या जयश्री पाटील यांचेही आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इतर इच्छुकांनी अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी राहायचं असं ठरलं होतं. मात्र हा निर्णय काही जणांनी यावेळी मान्य केलं नाही याचं नक्कीच शल्य जाणवतेय असं म्हटलंय.
खानापूरमध्ये शरद पवार गटामध्ये बंडखोरी
दुसरीकडे खानापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटातदेखील बंडखोरी झालेली आहे. खानापूर मतदारसंघातून तुतारी चिन्हावर वैभव पाटील यांना उमेदवारी मिळाली. आटपाडीचे राजेंद्र देशमुख हेदेखील खानापूर मतदारसंघातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने राजेंद्र देशमुख यांनी नाराज होऊन आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली. आता अपक्ष उमेदवार राजेंद्र देशमुख हे या निवडणुकीत किंगमेकर ठरणार की सुहास बाबर, वैभव पाटील यापैकी कुणाच्या विजयात अडथळा ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.
लोकसभेला विशाल पाटलांची बाजी
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये (Sangli Lok Sabha Election Result 2024) अपक्ष विशाल पाटील (Vishal Patil) विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्यात लढत झाली. यामध्ये विशाल पाटील यांनी बाजी मारली. त्यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 3, काँग्रेस 2, भाजप 2, शिवसेना 1 जागा मिळाली होती. आता सांगलीत 2024 विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ही बातमी वाचा: