Sangli Crime : महिलेचं मंगळसूत्र लांबवलं अन् धूम स्टाईलने पळून जाताना चोरट्यांच्या दुचाकीचा अपघात झाला, आरोपींना रुग्णालयातून अटक
Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरुन भरधाव वेगाने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांचा अपघात झाला अन् दोघे पोलिसांच्या जाळ्यात सापडले.
Sangli Crime : सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरजमध्ये (Miraj) रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र (Mangalsutra) चोरुन भरधाव वेगाने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांचा अपघात झाला अन् दोघे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधील नबी अली गरीब हुसेन इराणी आणि कर्नाटकातील दावणगिरी येथील जोहर अब्बास मोहसीन खान या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
मिरजेतील एका रुग्णालयात संगीता बंडगर ही महिला उपचारासाठी आल्या होत्या. त्या त्यांच्या पती समवेत चालत जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसका मारुन भरधाव वेगाने पोबारा केला. मात्र दुचाकीवरील दोघे चोरटे मिरज ते तासगाव रस्त्याने जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
चोरट्यांचा अपघात झाल्याची माहिती मिळाली अन् पोलीस रुग्णालयात पोहोचले
दरम्यान चोरट्यांचा सीसीटीव्हीच्या आधारे तपास करणाऱ्या महात्मा गांधी चौक पोलिसांना मिरजेतून दागिने चोरुन पोबारा केलेल्या चोरट्यांचा अपघात झाला असून त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. महात्मा गांधी चौक पोलिसांनी तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात जाऊन दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे लंपास केलेले मंगळसूत्र आढळून आले आहे. तसंच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील कर्नाटकातून चोरल्याचे कबुली दिले आहे. दोघांकडून पोलिसांनी मोटरसायकलसह एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
मिरजेत घरफोड्या करणाऱ्या 5 जणांना अटक
दुसरीकडे मिरजमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. कधी खून तर कधी दरोडा यांच्यासारख्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी सांगलीमधील मिरज शहर परिसरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, रोकड, संगणक असा 6 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींकडून मिरज शहरातील 6 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. महंमद कैस फैयाज मुल्ला (वय 20, रा. गुरुवार पेठ), लुमान अजीज गद्यालपटेल (वय 22, रा. किल्ला भाग), शाहिद मुनीर गोदड (वय 22, रा. टाकळी रोड), फैयाज सिकंदर गोदड (वय 19, रा. टाकळी रोड), अरबाज फैयाज वांगरे (वय 22, रा. किल्ला भाग, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा