Sangli News : जडीबुटी, दैवी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष, मांत्रिकासह चौघांना अटक
Sangli News : जडीबुटी आणि दैवी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना सांगलीत समोर आली आहे. एका व्यक्तीला तब्बल 15 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला.
Sangli Crime : सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील दोन सख्ख्या भावाच्या कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या ही गुप्तधनाच्या कारणातून झाली असल्याचं समोर येत आहे. या संशयातून काही मांत्रिक पोलिसांच्या रडारवर असताना आता जडीबुटी आणि दैवी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सुरुवातीला सांगलीतील दोन जणांना अटक करण्यात आली होती. आता मांत्रिकासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
सुनील मोतीलाल व्हटकर या व्यक्तीला काही जणांनी दैवी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून पंधरा लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी भोंदूबाबासह चौघांना अटक केलीय. चौघांकडून दीड लाखांची रोकड आणि दोन कार जत करण्यात आल्या आहेत. यापूर्वी अटक केलेल्यांमध्ये सांगलीतील बादशहा पाथरवट (वय 35 वर्षे), त्याची पत्नी आसमा (वय 30 वर्षे)यांचा समावेश होता. आता मांत्रिक भालचंद्र बेन्नाळकर उर्फ शंकर महाराज (वय 34 वर्षे, रा. अकलूज, जि. सोलापूर), संदीप सुभाष पाटील (वय 41 वर्षे , अंजनी, ता. तासगाव), रोहित महादेव ऐवळे (वय 32 वर्षे, खणभाग, सांगली) आणि अरुण शिवलिंग कोरे (वय 33 वर्षे, म्हैसाळ, (ता. मिरज) यांनाही आता अटक करण्यात आलीय. आता या प्रकरणातील शिवानंद शरणाप्पा हाचंगे (वय 60 वर्षे, विडी घरकूल, सोलापूर) हा अजूनही फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
फिर्यादी सुनील व्हटकर सोलापुरात शेती करतात. कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी काही दिवसापूर्वी शंकर महाराज याची भेट घेतली. शंकरने कौटुंबिक अडचणीवर काही उपाय सांगितले. तसेच पैशाची अडचण असेल तर सांगा, तुम्हाला पैशांचा पाऊस पाडून देतो," असे सांगितले. व्हटकर तयार झाले. यासाठी शंकरने त्यांना 25 लाख रुपये खर्च असल्याचे सांगितले. चर्चेअंती 15 लाख रुपये देण्याचे व्हटकर यांनी मान्य केले. "मी अनेकांना पैशाचा पाऊस पाडून दिला आहे," असेही शंकरने सांगितले. त्यानंतर सांगलीत बादशहा पाथरवट याच्याशी मोबाईल फोनवर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला. पाथरवट यानेही व्हटकर यांना मला महाराजांनी पैशाचा पाऊस पाडून दिल्याचे सांगून व्हटकर यांचा विश्वास संपादन केला. चौघांनी संगनमत करुन 15 मे ते 20 जून या कालावधीत व्हटकर यांना सांगली जवळील अंकली येथे बोलावून घेतले. तिथे जडीबुटीच्या सहाय्याने तुमच्या घरी जास्तीत जास्त पैसे मिळतील, घरी पैशाचा पाऊस पडेल असे आमिष दाखवले आणि त्यानंतर व्हटकर यांच्याकडून 15 लाख रुपये घेतले, पण प्रत्यक्षात या सर्वांनी पैशांचा पाऊस पाडून दाखवलाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्हटकर यांनी चार दिवसापूर्वी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर पाथरवट दाम्पत्यास तातडीने पोलिसांनी अटक केली. महाराजासह अन्य संशयितांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सोलापूर जिल्ह्यात तळ ठोकून होते. महाराज हा अकलूजचा असल्याची माहिती मिळाली.