(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Crime : भरधाव कार थेट रसवंतीगृहात घुसल्याने शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू; पलूस तालुक्यातील घटना
अपघात इतका भयंकर होता की रस्त्याच्या डाव्या बाजूने चाललेली गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या रसवंतीगृहात भरधाव वेगाने घुसली.
Sangli News : सांगली जिल्ह्यात (Sangli) पलूस (Palus) तालुक्यातील खंडोबाचीवाडीमध्ये भरधाव वेगाने जाणारी कार थेट रसवंतीगृहाच्या शेडमध्ये घुसल्याने एका शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. समर्थ संतोष शिंदे (वय 11) असे मृत मुलाचे नाव आहे. हा अपघात रविवारी घडला. भिलवडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून या घटनेनंतर चालक फरार झाला आहे. समर्थचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबातील लोकांनी व आई वडील यांनी मोठा आक्रोश केला.
तासगांव भिलवडी रोडवर खंडोबाचीवाडीत नायरा पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या शेताकडेला संतोष गोपाळ शिंदे यांचे रसवंतीगृह आहे. या रसवंतीगृहात चालक शिंदे यांचा मुलगा समर्थ बसला होता. भिलवडी स्टेशनकडून भरधाव वेगाने जाणारी सियाज कार (एमएच-10-सीएक्स-4081) रसवंती गृहाच्या शेडमध्ये घुसली. अपघात इतका भयंकर होता की रस्त्याच्या डाव्या बाजूने चाललेली गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या रसवंतीगृहात भरधाव वेगाने घुसली. रसवंती गृहाचे पत्र्याचे शेड उचकटून ते शेतात कोसळले.
मुलाला फरफटत नेले
रसवंतीगृहाजवळ बसलेल्या समर्थलाही गाडीने फरफटत नेले. गाडीच्या पुढील चाकाखाली आल्याने समर्थचा जागीच मृत्यू झाला. समर्थ खंडोबाचीवाडी विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता.अपघातानंतर ग्रामस्थ जमा होत असल्याचे पाहून चालक वाहन सोडून पसार झाला. सदर घटना नायरा पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत भिलवडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांकडून चालकाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा करुण अंत
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सांगली जिल्ह्यामध्येच मिरज तालुक्यातील बेडगमधील शेततळ्यात सख्ख्या दोन चिमुरड्या भावडांचा बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. अयाज युनूस सनदी (वय 10) आणि आफान युनूस सनदी (वय 7) असे दुर्दैवी अंत झालेल्या बालकांची नावे आहेत. जिल्हा परिषद शाळा नागरगोजेवाडीत सख्खे भाऊ शिकत होते. शाळा सुटल्यावर घरी निघाले असताना गावातील नागरगोजे वस्तीवरील तलावाशेजारून जाताना लहान भावाचा पाय घसरला आणि तो पडला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने पाण्यात उडी घेतली. यावेळी लहान भावाने मोठ्या भावाला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. युनूस सनदी यांना अयाज आणि अफान दोन मुले होती. या कुटुंबाचा आधारच गेल्याने संपूर्ण बेडग गावात शोककाळा पसरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या