Sangli Crime : आटपाडीत गावठी पिस्तुलासह तीन जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक, साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये गावठी पिस्तुलासह तीन जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
Sangli Crime : सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडीमध्ये गावठी पिस्तुलासह (Pistol) तीन जिवंत काडतुसे (Cartridge) घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने (Local Crime Branch Police) या दोघांना मोठ्या शिताफीने पकडले. पन्नास हजार रुपयांचे गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि चारचाकी असा एकूण साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परशुराम रमेश करवले आणि रविराज गोरवे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गस्तीवरील पथकाला गावठी पिस्तूल विक्रीसाठी येत असल्याची टीप
सांगली जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथके तयार करण्यात आली आहेत. पथकातील सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथक आटपाडी परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी आवळाई रस्त्यावर एक जण चारचाकीतून गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकातील अंमलदार सचिन कनप यांना मिळाली. त्यानुसार तातडीने पथकाने गुरुकुल शाळेजवळ सापळा रचला.
झडतीदरम्यान गावठी पिस्तूल सापडली
त्यावेळी एक काळ्या रंगाची चारचाकी संशस्यास्पदरीत्या आढळून आली. त्यातील परशुराम करवले आणि रविराज गोरवे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पथकाने अंगझडती घेतली असता परशुराम करवले याच्याकडे गावठी पिस्तूल संशयास्पदरीत्या आढळून आली. ही पिस्तूल आपण आणि रविराज गोरवे याने विक्रीसाठी आणल्याची त्याने कबुलीही दिली. त्यामुळे हत्यार अधिनियमानुसार आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात . आला. आटपाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, शरद मेमाणे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, अमोल ऐदाळे, सचिन कनप, सुनील जाधव मच्छिंद्र बर्डे, गौतम कांबळे, अजय बेंद्रे, संदीप पाटील, प्रकाश पाटील, आटपाडी पोलीस ठाण्याचे अमर फकीर, प्रमोद रोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सांगलीत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्याच्या अनेक घटना
सांगली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात ठिकठिकाणी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गुन्हेगारांच्या हातात चाकू, सुरा, तलवारीऐवजी आता पिस्तूल, रिव्हॉल्व्हर सर्रास दिसू लागली आहेत. दमदाटी, धमकावणे, वसुली यासाठी त्याचा वापर वाढत आहे. ही गावठी पिस्तुले अगदी चार-पाच हजारांपासून उपब्लब्ध होतात. मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान या राज्यातून पिस्तुले जिल्ह्यात दाखल होतात. त्यामध्ये मध्य प्रदेशात तयार झालेल्या पिस्तुलाला अधिक पसंती असते.