Sangli Robbery : सांगलीतील दरोडा 14 कोटी नव्हे तर 6 कोटींचा, रिलायन्स ज्वेल्सकडून चोरीला गेलेल्या रकमेबद्दल पोलिसांना पत्र
Sangli Robbery : सांगलीतील रिलायन्स ज्वेल्समध्ये 14 कोटी नव्हे तर 6 कोटींचा दरोडा पडला आहे. रिलायन्स ज्वेल्सकडून चोरीला गेलेल्या रकमेबद्दल पोलिसांना पत्र देण्यात आले. त्यात ही बाब समोर आली आहे
Sangli Robbery : सांगलीत (Sangli) मागील आठवड्यात रविवारी (4 जून) भरदिवसा फिल्मीस्टाईल रिलायन्स ज्वेल्सवर (Reliance Jewels) दरोडा पडला होता. भरदिवसा पडलेल्या या दरोड्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या दरोड्यातील संशयितांची रेखाचित्रे जारी केली आहेत. त्यातच आता या दरोड्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सांगलीतील रिलायन्स ज्वेल्समधील दरोडा हा 14 कोटी रुपयांचा नव्हे तर 6 कोटी रुपयांचा असल्याचं उघड झालं आहे. रिलायन्स ज्वेल्सकडून चोरीला गेलेल्या रकमेबद्दल पोलिसांना पत्र लिहिलं आहेत, त्यात या रकमेचा उल्लेख करण्यात आला आहे.
दरोड्यानंतर ज्वेल्समधील बंद पडलेली डिव्हीआर आणि स्कॅनिंग मशीन यंत्रणा चालू केल्यानंतर ज्वेल्समधील दागिन्याची मोजदाद करण्यात आली. यानंतर 14 कोटी रुपयांचा नव्हे तर 6 कोटी 44 लाख तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती रिलायन्स ज्वेल्सने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे. हिरे आणि सोन्याचे दागिने असलेली पिशवी पेढीतच आढळून आल्याने सहा कोटी 44 लाख 300 रुपयांचाच मुद्देमाल चोरट्यानी लंपास केल्याचे पत्रात म्हटलं आहे.
सांगली शहरातील गेल्या रविवारी रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवरील दरोड्यात 14 कोटी 69 हजार 300 रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे फिर्यादीत म्हटलं होतं. मात्र रिलायन्सच्यावतीने सुधारित पत्र पोलिसांना दिले, त्यात सहा कोटी 44 लाख 300 रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे म्हटलं आहे. रविवारी दुपारी दरोडा पडल्यानंतर 14 कोटींचा ऐवज लंपास झाल्याचे सांगण्यात आलं होतं. त्यानंतरच्या फिर्यादीत 14 कोटी 69 लाख 300 रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केल्याचं म्हणण्यात आलं होतं. मात्र, 'रिलायन्स'च्या वतीने एक पत्र पोलिसांना देण्यात आले त्यात हिरे आणि सोन्याचे दागिने असलेली पिशवी पेढीतच आढळून आल्याने सहा कोटी 44 लाख 300 रुपयांचाच माल चोरट्यानी लंपास केल्याचं पत्रात म्हटलं आहे.
रिलायन्स ज्वेल्सवर फिल्मीस्टाईलने दरोडा
वसंतदादा मार्केट यार्डाजवळील रिलायन्स ज्वेल्स या दुकानातून मागील आठवड्याच रविवारी (4 जून) भरदिवसा दरोडेखोरांनी 14 कोटी रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने लुटले होते. सांगली-मिरज रोडवर एक झाड रविवार दुपारी तोडण्यात येत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याचाच फायदा घेत दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला. घटनेनंतर पोलिसांनी चारही बाजूनी तपास सुरु ठेवला आहे. एलसीबीसह पोलिसांची पथके विविध ठिकाणी तपासासाठी रवाना झाली आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि बिहार येथेच तपासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यातही बिहारमध्ये स्थानिक पोलिसांना सूचना देत तपास सुरु ठेवला आहे. तपास करत असलेल्या पथकाला मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीमुळे दिल्ली आणि बिहारमध्येच तपासावर लक्ष केंद्रित केले आहे. हैदराबादमधील काहींकडे केलेल्या चौकशीचाही यासाठी उपयोग झाला आहे. हैदराबादमध्ये गेल्या दोन दिवसांपासून करण्यात आलेल्या तपासणीतूनही काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोल्हापूर पाठोपाठ सांगलीतील या सशस्त्र दरोड्याची उकल लवकरच होण्याची शक्यता आहे.
संशयितांची रेखाचित्रे जारी
रिलायन्स ज्वेल्समध्ये भरदिवसा पडलेल्या सशस्त्र दरोडामधील चार संशयित दरोडेखोरांचे रेखाचित्र सांगली पोलिसांकडून जारी करण्यात आली आहेत. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे. या रेखाचित्रातील संशयतांची माहिती कोणाला असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील असे आवाहनही पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले आहे.
संबंधित बातमी