Jayant Patil : काका कानाला बोटे लावा! जयंत पाटलांचा भाजप खासदार संजयकाका पाटलांना चिमटा
जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने सांगलीतील कुंडलमध्ये उभारण्यात आलेल्या क्रांती अग्रणी स्फूर्तीस्थळाचे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
Jayant Patil : स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने सांगली जिल्ह्यातील कुंडलमध्ये उभारण्यात आलेल्या क्रांती अग्रणी स्फूर्तीस्थळाचे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना राजकीय फटकेबाजी केली.
काका कानाला बोटे लावा
जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीमधील एकोप्यावर बोलताना जयंत पाटील (Jayant Patil on Sanjay Kaka Patil) यांनी व्यासपीठावर असलेल्या भाजप खासदार संजयकाका पाटील यांनाही चिमटा काढला. आमदार अरुण लाड यांना विधानपरिषद निवडणुकीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्वांनी मदत केली. आमदार विश्वजित कदम यांनी देखील मदत केली. अरुण अण्णांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते शरद लाड यांचे कौतुक करत असताना काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व नेते आता एकत्र येऊन काम करत आहे आणि पुढेही करूया, असं जयंत पाटील म्हणाले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे खासदार संजयकाका पाटील उपस्थित होते. तोच धागा पकडत त्यांना जयंत पाटील म्हणाले, काका कानाला बोटे लावा.
कृष्णेच्या पाण्याचा धाक ब्रिटिशांना देखील दाखवला
जयंत पाटील पुढे म्हणाले की, "राज्यात इंजिनिअररिंगचे जास्त विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये असतानाही फॉक्सकाॅन सारखा प्रकल्प बाहेर गेला. वेगवेगळ्या प्रथा, लव जिहाद मोर्चा निघत आहेत. धर्मा-धर्मात विष कालवण्याचे काम जे करत आहेत त्यांना आज लाड, नायकवडी याचा विचार सांगा." ते पुढे म्हणाले की, "जी.डी. बापूंनी क्रांती लढ्यात जिल्ह्यातील लोकांचा आवाज उठवला. कुंडल हे स्वातंत्र्यसंग्रामचे केंद्र होते. कृष्णेच्या पाण्याचा धाक ब्रिटिशांना देखील येथील स्वातंत्र्यसैनिकांनी दाखवला."
जयंत पाटील यांनी सांगितले की, "स्वातंत्र्यलढ्याच्या बाबतीत अग्रभागी असणाऱ्या जिल्ह्यांच्या इतिहासात देशात ज्या तीन जिल्ह्यांचे नाव आहे, त्यात बलिया आणि जुना सातारा जिल्हा होता. सातत्याने ब्रिटिशांविरोधात लढा लढला. बहुजन समाजाचे लढा पुढे घेऊन जाण्याचे काम जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांना केले. लाड कुटुंबाकडून जे स्मारक उभारले आहे, ते सुंदर बांधण्यात आले आहे."
जीडी बापू , क्रांतीसिंह नाना पाटील, नागनाथ अण्णा यांचे विचार सांगण्याची गरज
राज्यात संपन्नता आणायची असल्यास रोजगार देण्याची जबाबदारी आहे, जर महाराष्ट्र मागे जात असेल तर त्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले. ते म्हणाले की, आपण एकसंध राहण्याची गरज आहे. एकसंध राहून महाराष्ट्रचे चित्र बदलण्याचे काम करायचं आहे. जी. डी. बापूंचे जन्मशताब्दी शतक पूर्ण झाले आहे. ज्या घटकांना न्याय द्यायचा होता, त्या घटकांना पुढे घेऊन जाण्यासाठी शपथ घ्यायची आहे. आज राज्यात लव्ह जिहाद अशा गोष्टींचा प्रचार सुरू झाले आहेत. निवडणूक जवळ आल्या, की अशा गोष्टी सुरू होतात. त्यामुळे धर्मा-धर्मामध्ये तिढा निर्माण करण्याचे काम होत असेल, तर जीडी बापू लाड, क्रांतीसिंह नाना पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी यांचे विचार सांगण्याची गरज असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या