(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jayant Patil : राजकारण वेगळ्या वळचणीला, साधनसंपत्ती जास्त असेल तिकडे लोक जात आहेत; जयंत पाटलांचा 'काटा' रुते कुणाला?
jayant patil : एकमेकांचा वचपा काढायचे राजकारण सुरू आहे. राजकारण आज वेगळ्या वळचणीला गेलं आहे, साधनसंपत्ती जास्त असेल तिकडे लोक जात असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
सांगली : स्व. राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सांगली महानगरपालिकेकडून हा पुतळा उभारण्यात आला आहे. या कार्यक्रमात राजकीय टिकाटिप्पणी सुद्धा चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगली जिल्ह्याला भावनिक आवाहन केले. दुसरीकडे, जयंत पाटील यांनी सुद्धा केलेलं भाषण चर्चेचा विषय ठरले.
सांगली महानगरपालिकेमार्फत उभारलेल्या स्व. राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण आदरणीय खासदार श्री. @PawarSpeaks साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. आज दिवसभरात भरगच्च कार्यक्रम असतानाही आपल्या सर्वांच्या आग्रहाला मान देऊन आदरणीय पवार साहेब उपस्थित राहिले, यासाठी त्यांचे शतशः… pic.twitter.com/1YJ4jcOS1X
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 16, 2024
सांगली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात बापूंच्या कार्याचे अस्तित्व
जयंत पाटील म्हणाले की, चाळीस वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर देखील बापूंचे नाव आजही लोकांच्या मनात घर करून आहे. सांगली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात बापूंच्या कार्याचे अस्तित्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरताना बापूंसोबत काम केलेले त्यांचे सहकारी भेटतात आणि असंख्य आठवणींना उजाळा देतात. माणसे कशी जोडावीत, कार्यकर्ते कसे जपावेत हा आदर्श बापूंनी आपल्यासमोर ठेवला. विचारांचा मतभेद असू शकतो पण व्यक्तीचा मत्सर हा त्या पिढीने कधी केला नाही. स्व. यशवंतराव चव्हाण , स्व. वसंतदादा पाटील, स्व. बापू आणि त्याच पिढीतील पवार साहेब यांनी माणसे जोडून महाराष्ट्र उभा केला. आज दुर्दैवाने काळ बदलला आहे.
साधनसंपत्ती जास्त असेल तिकडे लोक
जयंत पाटील पुढे म्हणाले की, आज केवळ मत्सराचे राजकारण सुरू आहे. विचारांचे राजकारण आज राहिलेलं नाही. एकमेकांचा वचपा काढायचे राजकारण सुरू आहे. राजकारण आज वेगळ्या वळचणीला गेलं आहे, साधनसंपत्ती जास्त असेल तिकडे लोक जात आहेत. जयंत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांच्या टीकेचा रोख नेमका कोणाकडे? याची चर्चा सुरु झाली आहे.
चौथा कार्यक्रम आहे हे कळले तर खैर नाही!
दरम्यान, शरद पवारांचा हा दिवसातील चौथा कार्यक्रम आहे हे कळलं तर काही खैर नाही. सुप्रिया सुळे यांनी तब्येतीमुळे शरद पवार यांचे दिवसातून आता एक किंवा दोन कार्यक्रम करायचे असे सांगितले आहे, पण शरद पवारांचा आजचा चौथा कार्यक्रम आहे. सुप्रिया सुळे यांना हे जर कळाले तर काही खैर नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या