(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : जय जवान, जय किसान! खानापूर तालुक्यातील खंबाळेत एकाच पुतळ्याच्या रूपातून जवान आणि शेतकऱ्यांचा सन्मान
जवान आणि शेतकरी एकाच पुतळ्यात साकारण्याची किमया सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खंबाळे (भा.) गावच्या ग्रामस्थांनी केली आहे. त्यांनी एकाच पुतळ्यातून जवान आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
Sangli News : देशात पहिल्यांदाच बळीराजा आणि लढणाऱ्या सैन्याचा गौरव करण्यासाठी 'जय जवान, जय किसान' (Jay jawan jay Kisan) माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता. तेव्हापासून आजतागायत हा नारा दिला जातो. मात्र, या नाऱ्याला एकाच पुतळ्यात साकारण्याची किमया सांगली (Sangli News) जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खंबाळे (भा.) गावच्या ग्रामस्थांनी केली आहे. त्यांनी एकाच पुतळ्यातून जवान आणि शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे. या अनोख्या पुतळ्याचे लोकार्पण खानापूरचे आमदार अनिल बाबर आणि गावचे सरपंच, सदस्य आणि शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. अशा प्रकारे सन्मान करणारा पुतळा राज्यातील एकमेव असण्याची शक्यता आहे.
एक पुतळा दोन रुपात
'जय जवान, जय किसान' हा नारा खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरण्याचं काम सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खंबाळे गावकऱ्यांनी केलं आहे. खंबाळे गावातील ग्रामस्थांनी साकारलेल्या पुतळ्यातून शेतकरी आणि जवान यांचा एकत्रित सन्मान करणारा आहे. या पुतळ्याची अर्धी बाजू जवानाच्या रुपात असून दुसरी अर्धी बाजू शेतकऱ्याच्या रुपातील आहे. जवान आणि शेतकऱ्यांच्या रुपातील हा खास पुतळा गावच्या वेशीवर साकारण्यात आला आहे.
शहीद पोलिसांचा सन्मान
पुतळ्याच्या भोवती 26 /11 मध्ये शहीद पोलिस अधिकाऱ्यांचे फोटो लावून या गावानं शेतकरी आणि जवान शिवाय शहीद पोलिसांचा एक प्रकारे सन्मानच केला आहे. गावातील तरुणांना सैन्य दलामध्ये भरती होण्याची प्रेरणा मिळावी, म्हणून जवानाचा आणि जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकरी देखील तरुणांमध्ये तयार व्हावेत, या एकमेव हेतूने या अनोख्या पुतळ्याची उभारणी गावात करण्यात आली आहे. जवान आणि शेतकऱ्यांचा एकत्रित सन्मान करणारा हा बहुदा राज्यातील पहिलाच पुतळा असावा. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर आणि गावातील सरपंच आणि सर्व सदस्य आणि शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत या जवान आणि शेतकरी राजाच्या सन्मानाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या