Nitesh Rane : स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
Hindu Jan Akrosh Morcha : भाजप नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज सांगलीतील शिराळामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगली : हिंदू देव-देवतांची, साधु संतांची, श्री स्वामी समर्थ महाराजांची विटंबना करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करा, महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) व भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या समर्थनार्थ आज सांगलीतील शिराळामध्ये (Shirala) हिंदू जन आक्रोश मोर्चाचे (Hindu Jan Akrosh Morcha) आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.
अलीकडेच रामगिरी महाराजांनी एका विशिष्ट धर्माबद्दल दिलेल्या वक्तव्यानंतर हिंसा उसळली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी उघडपणे रामगिरी महाराजांचे समर्थन केल्याने नितेश राणे यांच्यावर टीका होत आहे. त्यातच आज पुन्हा नितेश राणे यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चातून नितेश राणे नेमकं काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
'या' आहेत मागण्या
शिराळामध्ये आज दुपारी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू देव देवतांची व साधु संतांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करा. तसेच महंत रामगिरी महाराज व नितेश राणे यांच्या विरोधात एका विशिष्ट समूदायाकडून असंविधानिक मार्गाने निदर्शने सुरु आहेत. आपला देश बाबासाहेबांच्या संविधानाने चालणारा आहे. शरिया कायद्याने नाही, शरियावाद्यांच्या विरोधात देशद्रोहाची कार्यवाही करावी, या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
रामगिरी महाराज, नितेश राणेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य करणारे रामगिरी महाराज आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकेची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करत सलोखा बिघडवल्याबद्दल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ता जमीला मर्चंट यांनी वकील एजाज मकबूल यांच्या वतीनं ही याचिका दाखल केली आहे.
नारायण राणेंकडून नितेश राणेंना समज
नितेश राणे यांनी फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, असं वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका असं सांगताना नितेश राणे यांनी खालच्या भाषेत टीका केली होती. यावरून नारायण राणे यांनी नितेश राणे यांना समज दिली. नितेश राणेंनी जे काही व्यक्तव्य केलं. त्याला तसं म्हणायचं नव्हतं. आमच्या देशात येऊन जर तुम्ही अतिरेकी कारवाया करणार असाल तर आम्ही आक्रमक होऊ, असं त्याला म्हणायचं होतं. मात्र, मशीद हा शब्द त्याने वापरायला नको होता. त्यानंतर त्याने त्यामध्ये खुलासा केला, की माझी चूक झाली, असे नारायण राणे यांनी म्हटले.
आणखी वाचा