Sangli News : सांगली जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना 47 लाखांचा गंडा; फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
सांगली (Sangli News) जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी चार पैसे जास्त मिळतील या अपेक्षेने अनोळखी व्यापाऱ्यांना आपली लाखोची द्राक्षे देऊन टाकतो आणि नंतर फसवणूक करून घेत आहे.
Sangli News : सांगली (Sangli News) जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape growers Farmer) आपल्या द्राक्षाला थोडाफार जास्त दर मिळतो म्हणून अनोळखी व्यापाऱ्याला लाखो रुपयांची द्राक्षे विना ओळख देऊन टाकतो आणि नंतर हा व्यापारी त्या द्राक्ष व्यापाऱ्यांना लाखो रुपयांना गंडा लावतो. द्राक्ष शेतकऱ्यांची ही फसवणुकीची मालिका सुरुच आहे. गेल्या काही वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Sanghtana) आणि पोलिस, जिल्हा प्रशासनाकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी ओळखीच्या आणि नोंदणी कागदपत्रे असलेल्या व्यापाऱ्यांकडेच द्राक्ष विकावीत, असं सातत्याने आवाहन करण्यात येत होतं. तरीही द्राक्ष उत्पादक शेतकरी चार पैसे जास्त मिळतील या अपेक्षेने अनोळखी व्यापाऱ्यांना आपली लाखोची द्राक्षे देऊन टाकतो आणि नंतर फसवणूक करून घेत आहे.
अवघ्या 15 दिवसांत गंडा घालून व्यापारी 'नॉट रिचेबल'
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून (Grape growers Farmer Cheating ) होणाऱ्या फ़सवणुकीची प्रकरणं नव्या वर्षातही द्राक्ष निर्यातीचा हंगाम सुरू झाल्यानंतर समोर येऊ लागली आहेत. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील हे द्राक्ष बागायतदार फसवणूक झालेल्यांपैकी आहेत. उत्तर प्रदेशातील तीन व्यापाऱ्यांनी या भागांतील शेतकऱ्यांचा विश्वास मिळवल्यानंतर द्राक्ष खरेदी करून अवघ्या 15 दिवसांत 20 द्राक्ष उत्पादकांना 47 लाख रुपयांचा गंडा घातला आणि हे व्यापारी 'नॉट रिचेबल' झाले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
नेमका प्रसंग काय घडला?
उत्तर प्रदेशातील तीन व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी सुरुवातीला तासगाव परिसरात 15 दिवसांपूर्वी दाखल झाले होते. एजंटाला हाताशी धरून त्यांनी मणेराजुरी परिसरात द्राक्ष हंगामाला सुरुवात झाल्यानंतर 23 जानेवारीपासून खरेदीला सुरुवात केली. सुरुवातीला रोख रक्कम देऊन द्राक्ष उत्पादकांचा विश्वास संपादन केला. रोखीने रक्कम मिळत असल्यामुळे मणेराजुरीतील शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्यांना द्राक्षांची विक्री केली.
खरेदी वाढल्यानंतर काही रक्कम देऊन, तांत्रिक कारणे सांगून उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. पंधरा दिवसांत 20 शेतकऱ्यांची द्राक्ष खरेदी करून, त्यांची 47 लाख रुपयांची देणी बाकी ठेवली आणि स्वतःचा बिस्तारा गुंडाळून पोबारा केला. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा अशा पद्धतीने फसवणुकीचा हा दरवर्षी प्रकार घडत आहे. त्यामुळे या द्राक्ष निर्यातीच्या बाबतीत सरकारने ठोस धोरण राबवत द्राक्ष विक्री केंद्रे उभारावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नाशवंत माल हीच शेतकऱ्यांची मोठी अडचण
द्राक्ष हे नाशवंत फळ आहे. यामुळे प्रत्येक बागायतदार आपआपली द्राक्षे बाजारपेठेत घालविण्यासाठी धडपडत असतो याचाच गैरफायदा द्राक्ष व्यापारी घेत असतो. प्रथमत: खरेदी केलेल्या द्राक्षपेटीला रोख व्यवहार करून, दुसऱ्यांदा तोच बागायतदारांचा विश्वास संपादन केला की पुन्हा लाखो रूपयांची द्राक्षे न्यायची, एक दोन वेळा केलेल्या व्यवहारावरून बागायतदार व दलाल याच्यात विश्वास निर्माण होतो आणि याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन फसवणुकीचा प्रकार घडतो. परंतु, याच काळात दलालाकडून फसवणुकीचा मोठा प्रकार घडत असतो. बागायतदाराचे थोडे-थोडे असे मिळून लाखो रूपयाचा गंडा घालत असतात. असे अनेक प्रकार उघडकीस येत आहे.
अशा फसव्या दलालाचा शोध घेणे म्हणजे दिव्यच आहे. केवळ ओळखीनेच द्राक्षे दिली जातात. त्यामुळे पोलिसांत जावून तक्रार करावी तर त्याचा पूर्ण पत्ता, ठावठिकाणा द्राक्षबागायतदाराना नसतो. त्यामुळे त्याचा तपास मर्यादीत राहतो. त्यामुळेच जसे दलाल मोकाट बनतात व पुन्हा पुढल्या वर्षी नवीन भागात गंडा घालण्याचे सत्र सुरूच ठेवतात.
ओळखपत्र घेण्याचे आवाहन
सध्या फसवणुकीचा प्रकार वाढत असून द्राक्ष खरेदी करताना जो व्यापारी आहे त्याने बाजार समितीचा परवाना घेतला आहे. अशांनाच बागायतदारांनी द्राक्षे द्यावीत. तसेच व्यवहार करताना व्यापाऱ्याचे आधार नंबर, फोटो, पॅनकार्ड तसेच फॉर्म भरून घ्यावा. त्यावर दोघांच्या सह्या असाव्यात म्हणजे एखाद्याने फसवणूक केली तर त्या फॉर्मच्या आधारे बागायतदार व पोलिस तपास करू शकतील. असे केल्यास फसवणुकीच्या प्रकाराला आळा बसेल. आधिक माहितीसाठी बाजार समिती व बागायतदार युनियन संघ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन दरवर्षी करण्यात येत आहे.
सरकारने द्राक्षविक्री केंद्रे बनवावीत
दरवर्षी बागायतदार मोठया कष्टाने द्राक्ष पिकवित असतो, पण नेहमीप्रमाणे ती विकण्यासाठी दलाल व व्यापार्यांवर अवलंबून असतो. या दलालीत दररोज नवनवीन काही चांगले व काही फसवे चेहरे येत असतात व विनाबोभाट बागायतदारांना गंडा घालत असतात हा आकडा दरवर्षी वाढतच आहे. यासाठी केंद्र सरकार व द्राक्ष बागायतदार संघ यांनी पुढाकार घेवून सर्व देशात स्वतंत्र द्राक्ष विक्री केंद्रे उभारणं आवश्यक आहे. द्राक्ष मोसमात त्याच केंद्रावरून व्यापाऱ्यांनी, दलालांनी द्राक्ष खरेदी करावीत. यासाठी भाजीपाला मार्केट व बाजार समितीच्या धर्तीवर नियोजन झाले तरच फसवणूकीचा गोरखधंदा थांबेल.
इतर महत्वाच्या बातम्या