Sangli News : हजारो फुट उंचीवर विमानात इंडो-अमेरिकन महिला चक्कर येऊन रक्तबंबाळ , पण इस्लामपूरचा सुपूत्र ठरला 'देवदूत'
डॉक्टर हर्षद हृदयविकारामधील आणखी विकसित प्रशिक्षणासाठी हर्षद लंडनमध्ये इंटरनॅशनल क्लिनिकल फिलोशिपसाठी रवाना झाले होते. याच विमानात महिलेला चक्कर आल्यानंतर खाली कोसळून डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ झाली होती.
Sangli News : मुंबईतून (Mumbai) उड्डाण केल्यानंतर लंडनच्या (London) दिशेनं निघालेल्या हजारो फुट उंचीवरील विमानात एक इंडो-अमेरिकन महिला चक्कर येऊन पडली आणि रक्तबंबाळ झाली. हजारो फुट उंचीवर घडलेल्या या घटनेनंतर सर्वांचीच भंबेरी उडाली. मात्र, याच विमानातून प्रवास करत असलेल्या सांगलीमधील इस्लामपूरचा (Islampur) सुपूत्र त्या इंडो-अमेरिकन महिलेसाठी देवदूत ठरला. विमानात त्यांनी अत्यंत धाडसाने जखमी महिलेवर तत्काळ उपचार करत प्राण वाचवले. त्यामुळे हर्षद यांनी दाखवलेल्या धैर्याने विमानातील सहप्रवाशांनी डॉक्टर हर्षद आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या दोन महिलांसाठी उभे राहून कृतज्ञता व्यक्त केली. हा सर्व प्रसंग एखाद्या थरारपटाला शोभेल असा मुंबईहून लंडनकडे जाताना विमानात घडला.
तो देवदूत कोण? प्रसंग नेमका काय घडला?
सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरातील (Islampur) डॉक्टर पी.टी.शहा आणि डॉक्टर नलिनी शहा यांचे सुपुत्र डॉक्टर हर्षद शहा हे मुंबईत वैद्यकीय पदवी शिक्षण घेत आहेत. हृदयविकार रोगामधील आणखी विकसित प्रशिक्षणासाठी हर्षद शहा लंडनमध्ये इंटरनॅशनल क्लिनिकल फिलोशिपसाठी रविवारी (12 मार्च) रवाना झाले. याच विमानात सहप्रवासी असलेल्या महिलेला चक्कर आली. चक्कर आल्यानंतर त्या महिलेल्या खाली कोसळून डोक्याला मार लागली. यामध्ये ती महिला चांगलीच रक्तबंबाळ झाली. त्यामुळे एक इंडो-अमेरिकन महिलेसोबत घडलेल्या या प्रकाराने विमानातील सर्वांचीच तारांबळ उडाली. त्यामुळे क्रू मेंबर्सही चांगलेच घाबरून गेले. त्यामुळे एअर होस्टेसकडून विमानामध्ये कोणी डॉक्टर असल्यास मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी तातडीने डॉक्टर हर्षद शहा त्या महिलेच्या मदतीसाठी धावले.
परिस्थिती बेताची असतानाही संयमाने उपचार
जखमी महिलेवर हर्षद यांनी तपासणी करत प्रवासी असलेल्या महिलांच्या सहाय्याने तसेच उपलब्ध औषधी सामग्रीने उपचार सुरू केले. महिलेचा रक्तस्त्राव झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावी लागणार का? अशीही चर्चा सुरु झाली. वैमानिकाने तेहरान एअरपोर्टवर लँडिंग करण्यासाठी विचारणा केली. तसेच लँडिग केल्यास पुन्हा दीड दिवस टेक ऑफ करता येणार नाही याचीही माहिती दिली. अशी आव्हानात्मक परिस्थिती असतानाही हर्षद यांनी वेळ देण्याची मागणी करत संयमाने उपचार सुरू केले. बिझनेस क्लासमधील एका बेडवर महिलेवर झोपवून हर्षद यांनी उपचार सुरू केल्यानंतर महिलेने उपचाराला प्रतिसाद दिला. त्यामुळे हर्षद यांच्यासह सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
इतर महत्वाच्या बातम्या