Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
Vilasrao Deshmukh Latur: भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लक्षात येते की लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही, असे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केले होते.

Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, असे वक्तव्य करुन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचंड वाद आणि नाराजी ओढावून घेतली होती. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली होती. सर्वपक्षीय राजकारण्यांशी सलोख्याने वागणाऱ्या विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्याबाबत रवींद्र चव्हाणांची भाषा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला फारशी पसंत पडली नव्हती. त्यामुळे या सगळ्याचे पडसाद लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Latur Mahanagarpalika Election 2026) उमटण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी लातूरमध्ये झालेल्या सभेत या सगळ्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. विलासराव देशमुख यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
लातूर ही एक अशी भूमी आहे की, जिने महाराष्ट्राला खूप मोठ्याप्रमाणावर नेतृत्व दिले. यामध्ये चाकूरकर साहेबांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात नगराध्यक्षपदापासून ते लोकसभा अध्यक्ष, देशाचा गृहमंत्री असा प्रवेश केला. राजकारणात अशाप्रकारचे लोक आपल्याला विरळ दिसतात. त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील किंवा ज्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख असतील ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील. खऱ्या अर्थाने विलासरावजी देशमुख हे एक असे नाव आहे, जे पक्षाच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्राच्या जडघडणीत मोलाचा वाटा आहे म्हणून आपण त्यांचा आदर करतो. हे सांगताना माझ्या मनात कुठलाही संकोच नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
दोन दिवसांपूर्वी याठिकाणी काही संभ्रम निर्माण झाला, गोंधळ झाला. आमचे अध्यक्ष याठिकाणी आले होते. त्यांना बोलायचं होतं, राजकीयदृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचाय. पण कदाचित त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने गेले असतील, याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण मी जाहीरपणे सांगतो, आमची लढाई काँग्रेस पक्षाशी असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. ते या महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते होते, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता दुखावले गेलेले लातूरकर शांत होणार का, हे बघावे लागेल.
आणखी वाचा























