व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
विधानसभा निवडणुकीत मला 50 हजार मताधिक्य आहे, वॉर्ड 225 मध्ये 13 हजार मतांचे मताधिक्य आहे, 226 मधून 14 हजार तर 227 मधून 9 हजारांचे मताधिक्य होते.

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांचा उमेदवारी अर्ज भरताना दबाव टाकून पोलिसांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ चांगलाच (Viral video) व्हायरल झाला होता. त्यावरुन, शिवसेना खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनीही राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप केले होते. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांच्या निलंबनाची मागणी केली आहे. यासंदर्भात कुलाब्यातील इच्छुक उमेदवारांकडून न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. आता, घडल्या प्रकाराबाबत राहुल नार्वेकर यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, शिवसेना (Shivsena) खासदारांनी केलेले आरोपही त्यांनी फेटाळून लावले. अरविंद सावंत यांचे आरोप हास्यास्पद आहेत, ज्या महिलेनं दबाव टाकल्याचे आरोप केले त्यांना मी पाहिलेले नाही, ना कधी भेटलो आहे, असे नार्वेकर यांनी म्हटले.
विधानसभा निवडणुकीत मला 50 हजार मताधिक्य आहे, वॉर्ड 225 मध्ये 13 हजार मतांचे मताधिक्य आहे, 226 मधून 14 हजार तर 227 मधून 9 हजारांचे मताधिक्य होते. त्यामुळे, कोणालाही धमकावण्याचा प्रश्न येत नाही, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले. निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख 2 होती, आज 7 तारीख आहे. इतके 5 दिवस काय प्लॅनिंगमध्ये गेलेत का? हे सगळं पॉलिटिकली मोटिव्हेटेड आहे. मागील 15 वर्षांपासून आम्ही कुलाबा वासियांची सेवा करत आहे, बिनबुड्याच्या आरोपांवर बोलण्यात अर्थ नाही. हा व्यक्ती, दिपक पवार नावाची मी आत्ताच माहिती घेतली. त्यानुसार, लोकसभेत ह्या व्यक्तीवर आरोप आहेत, पैशांसाठी उमेदवारांना धमकावले. उमेदवाऱ्या भरुन पैसे उकळण्याचा यांचा धंदा आहे, असे म्हणत विधानसभा अध्यक्षांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.
जर त्या चांगल्या उमेदवार होत्या तर तुम्हीच त्यांना उमेदवार करायला पाहिजे होते ना? पण घाणेरडे प्रकार विरोधी पक्षांकडून होत आहेत. उमेदवार उभे करायला त्यांच्याकडे हा वॉर्ड नाही. आम्ही मेहनत करत काम केलं, मात्र स्वत:साठी तिकीट घेता आलं नाही. विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे. कोर्टात याचिका दाखल करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, कोर्टाने तातडीनं सुनावणी घेतली नाही, अशी माहितीही नार्वेकरांनी दिली. गेली 5 दिवस ही सगळी लोकं झोपलेली होती. उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी रुपये मागण्याचे ह्या लोकांनी प्रयत्न केले होते. याबाबत, लेखी तक्रारी आणि खुलासा आम्ही करणार आहोत. मी कायद्याचा अभ्यासक आहे, कायदा काय आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे, मी सभागृहात आणि बाहेर, मी न्याय देण्याचे काम करत आलो आहे, असे नार्वेकरांनी म्हटले.
राहुल नार्वेकरांवर आरोप,कोर्टात याचिका
राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघातील वार्ड क्रमांक 225, 226 आणि 227 मधून त्यांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवार आहेत. येथील वार्ड 225, 226 आणि 227 मध्ये अनुक्रमे राहुल नार्वेकर यांची मेहुणी हर्षिता शिवलकर, भाऊ मकरंद नार्वेकर आणि बहीण गौरी नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळेच नार्वेकर यांनी राजकीय सत्तेचा आणि विधानसभेच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला आणि इच्छुक उमेदवारांना (याचिकाकर्त्यांना) निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून बाहेर काढण्यासाठी पोलिस यंत्रणेवर दबाव आणल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नार्वेकर हे घटनात्मक पदावर असताना, विविध पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज भरताना ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थित का होते, असा प्रश्नही याचिकेत उपस्थित केला आहे.
हेही वाचा
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
























