भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसची युती झाली. शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेस अशी हातमिळवणी झाली.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 ते 7 वर्षात राजकारण 360 अंशात बदलल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील कोणता राजकीय पक्ष कोणासोबत गेला आणि कोणत्या पक्षातील नेता कुठल्या पक्षात गेला याची अनेक कधी न पाहण्यात आलेली उदाहरणं निर्माण झाली आहेत. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपसोबत (BJP) युतीत सहभागी होत सत्ता मिळवली. तर, शिवसेना ठाकरे पक्षानेही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आधीच आघाडी केली होती. त्यामुळे, राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. मात्र, नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर झालेल्या दोन युतीमुळे अनेकांचे डोळे चक्रावले आहेत. कारण, भाजपने अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत (Congress) हातमिळवणी केली. तर, अकोल्यातली (Akola) अकोटमध्ये चक्क एमआयएमसोबत युती केली आहे. आता, या युतीवरुन भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसची युती झाली. शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेस अशी हातमिळवणी झाली. येथे भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. अंबरनाथमध्ये भाजपकडे नगरपरिषदेत बहुमत मात्र नव्हतं. भाजपचे 16, काँग्रेसचे 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 अशा 32 नगरसेवकांची मोट बांधत भाजपने मित्रपक्ष शिंदेंच्या शिवसेनेला दूर सारलं. मात्र, भाजपसोबत काँग्रेस गेल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी तातडीने कारवाई केली. अंबरनाथ नगरपालिकांमध्ये भाजपसोबत काँग्रेसने युती केल्याने येथील काँग्रेस नेते प्रदीप पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच, पक्षशिस्त भंग करणाऱ्या नगरसेवकांनाही त्यांनी पक्षातून निलंबित केलं आहे. अंबरनाथमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेत असताना पक्षाला कुठल्याही प्रकारची माहिती न पुरवल्याचा आरोप करत कारवाई प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई केली.
दुसरीकडे अकोट नगरपरिषदेत भाजपने चक्क एमआयएमला सत्तेसाठी सोबत घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. या अकोट विकास मंचमध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा एमआयएम, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती सहभागी झाली. या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. त्यामुळे, सत्तेसाठी अंबरनाथमध्ये काँग्रेसला सोबत घेतलं, तर अकोटमध्ये एमआयएमशी युती केल्याने भाजपवर टीका होत आहे. आता, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
युती करणाऱ्यांवर कारवाई करणार - फडणवीस
काँग्रेस आणि एमआयएमसोबतची युती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, ती युती तोडावी लागेल. जर स्थानिक पातळीवर कोणी अशी युती-आघाडी केली असेल तर ती चुकीची आणि बेशिस्त आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले आहे.
हेही वाचा
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न





















