Jayant Patil : अजितदादांपूर्वी जयंत पाटलांना फडणवीसांकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर; जयंत पाटलांच्या विश्वासू सहकाऱ्याचा गौप्यस्फोट!
दीड वर्षांपूर्वी फडणवीस यांनी जयंत पाटलांना ही ऑफर दिली होती आणि या ऑफरबाबत खुद्द जयंत पाटलांनी आपल्यासह सहकाऱ्याशी चर्चा देखील केली होती, असेही ते म्हणाले.
![Jayant Patil : अजितदादांपूर्वी जयंत पाटलांना फडणवीसांकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर; जयंत पाटलांच्या विश्वासू सहकाऱ्याचा गौप्यस्फोट! devendra Fadnavis offers Jayant Patil Deputy Chief Minister post before Ajit pawar trusted colleague secret explosion in sangli bjp ncp Jayant Patil : अजितदादांपूर्वी जयंत पाटलांना फडणवीसांकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर; जयंत पाटलांच्या विश्वासू सहकाऱ्याचा गौप्यस्फोट!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/22/cc93fadf9a85c942b8aa9712853467641708607786298736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : अजित पवारांच्या (Ajit Pawar) आधी जयंत पाटील (Jayant Patil) यांना भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देत भाजपत येण्याची विनंती करण्यात आली होती, असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी व राजारामबापू साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पी.आर. पाटील यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ऑफर दिली होती, असा दावाही पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत बोलताना केला. दीड वर्षांपूर्वी फडणवीस यांनी जयंत पाटलांना ही ऑफर दिली होती आणि या ऑफरबाबत खुद्द जयंत पाटलांनी आपल्यासह सहकाऱ्याशी चर्चा देखील केली होती, असेही ते म्हणाले.
शरद पवारांसोबत राहण्याचा निर्धार
मात्र, जयंत पाटलांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्धार करत फडणवीस यांची ऑफर स्वीकारली नाही,असेही पी आर पाटील म्हणाले. जयंत पाटलांच्या बाबतीत सुरू असणाऱ्या अफवा असून त्यावर कोणी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. सांगलीच्या कुरळपमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. जयंत पाटील यांच्या भाजपत जाण्याची चर्चा सुरू झाल्यावर जयंत पाटलांनी आपण भाजपात जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशावर तुर्त पडदा पडलेला असताना आता त्यांचेच विश्वासू सहकाऱ्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे जयंत पाटलांशी भाजपशी चर्चा झाल्याचे समोर आले आहे.
सुजय विखेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
एका बाजूने जयंत पाटील यांच्या विश्वासू सहकाऱ्याने केलेल्या दाव्यानंतर खासदार सुजय विखे-पाटील यांनीही केलेल्या वक्तव्याने भूवया उंचावल्या आहेत. जयंत पाटील हेच शरद पवारांसोबत किती दिवस थांबणार आहेत, ते विचारुन घ्या. नाहीतर शेवटचा डाव जयंत पाटीलच टाकायचे, अशी टिप्पणी सुजय विखे यांनी केली. काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण या तीन नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महायुतीमध्ये प्रवेश केल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यामुळे उडालेला धुरळा खाली बसला नाही तोच शरद पवार यांच्या जवळचा नेता भाजपमध्ये जाणार, अशी नवी चर्चा सुरु झाली होती. या चर्चेचा रोख जयंत पाटील यांच्या दिशेने असल्याचे सांगितले जाते.
परंतु, शरद पवार गटाकडून या वृत्ताचा इन्कार करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी ही बातमी पेरण्यात आल्याचे सांगण्यात आले. तरीही जयंत पाटील आणि त्यांचा मुलगा भाजपमध्ये जाणार, ही चर्चा काही थांबलेली नाही. शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर भाजप खासदार सुजय विखे यांनी आता काँग्रेस पक्षच काही दिवसांनी संपुष्टात येणार असल्याचे म्हटले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)