Dahi handi in Sangli : सांगली शहरात उद्यापासून सलग तीन दिवस दहीहंडीची धूम, लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन
सांगलीत यंदा तर 20 ते 22 ऑगस्ट अशा तिन्ही दिवशी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडी उत्सवावेळी राजकीय मंडळी बरोबरच मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीसह मोठे कलाकार उपस्थित राहणार आहेत.
Dahi handi in Sangli : कोरोनामुळे दोन वर्षांमध्ये सर्वच सण, कार्यक्रमावर निर्बध आले होते. मात्र, आता कोरोनाचे सर्व निर्बध हटवले गेल्याने आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाचा दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असे सांगितल्याने सांगलीत यंदा दहीहंडीचा मोठा उत्साह दिसून येत आहे.
सांगलीत यंदा तर 20 ते 22 ऑगस्ट अशा तिन्ही दिवशी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. उद्या 20 ऑगस्ट रोजी माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या विश्वजीत युथ फौंडेशनचा दहीहंडी सोहळा पार पडेल, तर 21 ऑगस्ट रोजी माजी उपमहापौर आणि भाजपचे युवा नेते धीरज सूर्यवंशी यांच्या साथीदार युथ फाउंडेशनचा दहीहंडी उत्सव होणार आहे. हे दोन्ही उत्सव सांगलीतील तरुण भारत स्टेडियम मध्ये पार पडणार आहेत.
22 ऑगस्ट रोजी भाजपचे नेते सुयोग सुतार यांच्या लालबाग प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव सांगलीतील नेमिनाथनगरमधील राजमती ग्राउंडवर पडणार आहे. प्रत्येक दिवशीच्या या दहीहंडी उत्सवावेळी राजकीय मंडळी बरोबरच मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीसह काही मोठे कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत.
विश्वजीत युथ फौंडेशनच्या दहीहंडीला KGF फेम रामचंद्राचे प्रमुख आकर्षण, बक्षीस सव्वा लाख
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या विश्वजीत युथ फौंडेशनचा दहीहंडी सोहळ्याचे बक्षीस सव्वा लाख आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास सुरुवात होणाऱ्या या उत्सवासाठी विश्वजित कदम यांच्या बरोबर KGF फेम रामचंद्रा राजू (गरुडा) आणि प्रसिद्ध सिनेकलाकार स्नेहलता वसईकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. खास आकर्षण म्हणून सिने कलाकार डॉल्बी साऊंड, स्पेशल लेसर शो आणि बॉलीवूड ग्रुप डान्स ठेवण्यात आला आहे. या प्रसंगी महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था देखील आयोजकाकडून करण्यात आली आहे.
साथीदार युथ फाउंडेशनच्या दहीहंडीला राजकारणी
माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांच्या साथीदार युथ फाऊंडेशनची दहीहंडी 21 ऑगस्टला सायंकाळी 4 ते 10 या वेळेत शहरातील तरुण भारत या स्टेडियममध्ये होणार आहे. या दहीहंडी उत्सवासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, खा. संजय काका पाटील, खा. धनंजय महाडिक, माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमांमध्ये डॉल्बी साउंड,स्पेशल लाईट आणि लेझर शो सह सांस्कृतिक नृत्य असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या दहीहंडीमध्ये तासगाव,शिरोळ ,गडहिंग्लज या भागातील नामवंत गोविंदा पथक भाग घेणार असून या स्पर्धेच्या विजेत्या पथकाला साथीदार चषक व रोख रक्कम 1 लाख 11 हजार 777 रुपये येणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन साथीदार युथ फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते करत आहेत.
लालबाग प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुलेची उपस्थिती
भाजपचे नेते सुयोग सुतार यांच्या लालबाग प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव नेमिनाथनगरमधील राजमती ग्राउंड 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता पार पडणार आहे. या दहीहंडी उत्सवाचे बक्षीस हे 2 लाख 11हजार 111 इतके आहे . प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुलेची या दहीहंडीस प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच या दहीहंडी उत्सवात डॉल्बी साऊड, स्पेशल लाईट शो, ग्रुप डान्स देखील ठेंवण्यात आले आहेत.