Sangli Crime : तीन महिन्यांत दीडपट रक्कम देण्याचे आमिष; खानापूर तालुक्यातील 12 जणांची पुण्यातील चौघांकडून तब्बल 3 कोटी 28 लाखांची फसवणूक
खानापूर तालुक्यातील माहुली गावातील 12 ग्रामस्थांची पुण्यातील चौघांकडून कोट्यवधीची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दीडपट रक्कम देण्याच्या आमिषाने तब्बल 3 कोटी 28 लाखांची फसवणूक झाली आहे.
Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील माहुली गावातील 12 ग्रामस्थांची पुण्यातील चौघांकडून कोट्यवधीची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यांमध्ये दीडपट रक्कम देण्याच्या आमिषाने तब्बल 3 कोटी 28 लाखांची फसवणूक झाली आहे. माहुली गावच्या आबासाहेब देशमुख यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील चौघांविरूध्द विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ऋषिकेश अशोक बारटक्के, नितीन सुभाष शहा, आदित्य दाडे, श्रीमती निलमणी धैर्यशील देसाई अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे असून यातील ऋषिकेशला विटा पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती विटा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
या आमिषामध्ये आलिशान गाडीही देतो म्हणूनही सांगण्यात आले होते. आबासाहेब देशमुख यांनी विटा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2015 मध्ये ते पुण्यातील एका ऑपरेशनसाठी दाखल असताना तिथे डाॅ. सुशांक शहा यांचे भाऊ नितीन शहा यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यामुळे वेळोवेळी माझी नितीन शहा यांच्याशी भेट होत होती. त्यातून मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. त्यामुळे नितीन यांचे मित्र ऋषीकेश बारटक्के हेही माहुली येथे देशमुख यांच्याकडे नियमित येत होते.
ऑगस्ट २०१७ मध्ये ऋषीकेश बारटक्के हा पुणे येथे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करत असून त्यांनी सध्या निलमणी धैर्यशील देसाई यांच्या मालकीचे पर्वती येथील सर्व्हे नं.87/1अ/1 पैकी 49 गुंठे जागा कुलमुखत्यार पत्राव्दारे सर्व शासकीय कार्यवाही पुर्ण करून तो विक्री करण्यासाठी घेतलेली असल्याचे सांगून निलमणी देसाई यांच्याकडून ऋषीकेश बारटक्के यांचे नांवे घेतलेले कुलमुखत्यारपत्र देशमुख यांना दाखविले. या जागेमध्ये असलेल्या महसुलच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी आणि जागेमध्ये इतर कामे करण्यासाठी अंदाजे 4 कोटी रूपयांची गरज असून या जागेमध्ये त्यांनी गुंतवणूक केल्यास रक्कमेवरती 3 महिन्यामध्ये दीडपट मोबदला बारटक्के आणि शहा हे तुम्हाला देतील असं सांगण्यात आले. तसेच नवीन चारचाकी आलीशान वाहनही देतील, असे दुहेरी आमिषही दाखविले गेले.
सुरुवातीला आबासाहेब देशमुख यांनी स्वत:कडील रोख आणि आरटीजीएसने 1 कोटी 51 लाख रूपये या लोकांना दिले. आणखी रक्कम लागते म्हटल्यावर माहुली परिसरातील ओळखीच्या अन्य 12 लोकांनी बँकेतून शेती, नोकरी, सोने गहाण कर्ज काढून 1 कोटी 77 लाख 50 हजार असे एकूण ऋषीकेश बारटक्के व नितीन शहा यांच्याकडे एकूण 3 कोटी 58 लाख रूपये दिले. त्यावेळी ऋषीकेशने त्याची फोर्ड इंडिव्हेअर (क्र. एम.एच.12, एन.पी.0006) ही गाडी व्यवहारापोटी आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने देशमुख यांना दिली. परंतु, बारटक्के याने ही गाडी खरेदी केल्यापासून बँकेचे हप्ते भरणा केलेले नाहीत. तसेच या गाडीवर एसबीआयचा बोजा असल्याचे त्यांना समजले.
त्यानंतर देशमुख आणि त्यांच्या सोबतच्या इतर गुंतवणूकदारांनी ऋषीकेश बारटक्के आणि नितीन शहा यांच्याकडे पैशांबाबत पाठपुरावा केला. त्यावेळी 18 फेब्रुवारी 2020 रोजी करारनामा करून 4 महिन्यामध्ये पैसे देण्याचे मान्य केले. परंतु त्यानंतर आजपर्यंत पैसे न देता टाळाटाळ केली आहे, त्यामुळे अलिशान गाडी देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी संबंधित चारही जणांवर विटा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.