Shivsena UBT: उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये! पक्षविरोधी कारवायामुळे कोकणातील 3 नेत्यांची केली हकालपट्टी; कोण आहेत ते नेते?
Shivsena UBT: उद्धव ठाकरेंच्या आदेशाने कोकणातील 3 बड्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

मुंबई - विधानसभेनंतर आता महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून शिवेसेना ठाकरे गटाला मोठे धक्के बसत आहेत. ठाकरे गटाला खिंडार पडत असल्याचं चित्र आहे. ठाकरे गटातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच नुकतंच कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतलं आहे. त्यामुळे कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या आदेशाने कोकणातील 3 बड्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रामध्ये म्हटलंय की, रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आल्याचं पत्रकातून कळवण्यात आलं आहे.
काय लिहलंय पत्रात?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी, रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन वने यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
रत्नागिरीत ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत, त्यांच्या नेतृत्वात सेनेचे 2 माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, दापोलीतील उद्धव सेनेचे 5 माजी नगरसेवक, आणि पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. आजच्या कार्यक्रमात संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, राजापूरचे माजी आमदार गणपत कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार आहेत.
राजन साळवींनी शिंदेच्या शिवसेनेत केला प्रवेश
राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंना रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यातील आनंद मठाजवळ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश पार पडला. राजन साळवींनी हाती धनुष्यबाण घेत शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांच्या गळ्यात शिवसेना शिंदे गटाचे उपरण घातलं आणि राजन साळवींचा शिंदे गटाचा प्रवेश झाला. साळवींसोबत कोकणातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
