कोकणातील रिफायनरी भागात शिवसेना नेते आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जमीनी ; अशोक वालम यांचा गंभीर आरोप
Konkan Refinery Protest : नाणार भागातील रिफायनरी विरोधकांचे नेते अशोक वालम यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. कोकणातील रिफायनरी भागात शिवसेना नेते आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जमीनी असल्याचा आरोप वालम यांनी केलाय.
रत्नागिरी : कोकणातील रिफायनरीवरून सध्या अनेक खुलासे दिवसेंदिवस केले जात आहेत. अशातच आता नाणार भागातील रिफायनरी विरोधकांचे नेते अशोक वालम यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या ज्या भागात रिफायनरी यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या भागात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी जमीन खरेदी केली आहे. शिवाय, एका उच्च मंत्र्यांच्या नातेवाईकानं देखील जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप वालम यांनी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
वालम म्हणाले, "याबाबत सध्या आम्ही माहिती गोळा करत आहोत. आम्ही योग्य वेळी पुराव्यासह पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहोत. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेने विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही. 2019 च्या निवडणुकीच्या भेटीवेळी रिफायनरी विषय संपला असा शब्द दिला होता. पण, त्यांनी शब्द फिरवला आहे, असा आरोप वालम यांनी केलाय. सर्वच राजकीय पक्षांना काही वर्षापूर्वी हा प्रकल्प विनाशकारी वाटत होता. पण, आता सर्वजण त्याचं समर्थन करत आहेत. पण, प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही मोठं जनआंदोलन उभं करू, असा इशारा वालम यांनी दिलाय.
रिफायनरी विरोधी संघटना निवडणुकीच्या रिंगणात
रिफायनरीला विरोध करताना बारसू - सोलगाव पंचक्रोशीत रिफायनरी विरोधी पॅनल उभं केलं जाणार आहे. तशाच प्रकारचं पॅनल आता नाणारमधील पंचक्रोशीत उभारलं जाणार आहे, अशी माहिती देखील यावेळी वालम यांनी दिली. "ज्या लोकांचं यामध्ये काहीही जात नाही असे लोकं रिफानरीचे समर्थन करत आहेत. पण, स्थानिकांचा विरोध कायम आहे. तो पाहण्यासाठी तुम्ही गावामध्ये या, तुम्हाला तो विरोध दिसेल. प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा अशोक वालम यांनी दिला आहे.
'प्रकल्पासाठी नाणार भागातील गावांचा विचार व्हावा'
राजापुरातील प्रस्तावित रिफायनरीचा आवाका वाढवावा यासाठी आता जमीनधारक आक्रमक झाले आहेत. दोनच दिवसापूर्वी जमीन अधिग्रहणासाठी मालकांची संमतीपत्र घेवून जमीन मालक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले होते. नाणार, दत्तवाडी पाळेकरवाडी ही गावं वगळून आठ हजार एकरची जमीन घेण्याची संमतीपत्र अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहेत.
विल्ये दक्षक्रोशी रिफायनरी समर्थक संघटनेकडून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना ही संमतीपत्र दिली आहेत. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी तीन हजार एकरवरची जमीन मालकांनी संमतीपत्र देण्यात आली होती. या ठिकाणच्या बारसू सोलगावातील रिफायनरी प्रकल्पाला विरोध नाही. पण, धोपेश्वर रिफायनरीचा 20 एमएमटीपीए प्रकल्प होतोय. नाणारमधला पहिला रिफायनरी प्रकल्पाचा आवाका 60 एमएमटीपीए क्षमतेचा होता. बारसू सोलगावात कमी क्षमतेचा रिफायनरी प्रकल्प न राबवता वाढीव क्षमतेची रिफायनरी प्रकल्प उभारून त्यात विल्ये दक्षक्रोशीची जमीन घ्यावी यासाठी ही संमतीपत्र जमीन मालकांनी दिली आहेत, अशी माहिती वालम यांनी दिली आहे.