Ratnagiri News : पावसाळ्यात कोकणातून जपून प्रवास करा, 'हे' तीन घाट बंद!
Ratnagiri News : वर्षा पर्यटनासाठी किंवा इतर कामासाठी जर तुम्ही कोकणात जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
रत्नागिरी : पावसाळा सुरु झाला आहे त्यामुळे भटकंती करणाऱ्यांची पावलं आपसूचक निसर्गाच्या सानिध्यात वळतात. वर्षा पर्यटनासाठी किंवा इतर कामासाठी जर तुम्ही कोकणात जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अतिवृष्टी, दरड कोसळण्याची भीती आणि महामार्गाचं काम हे सगळं लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने तीन घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात कोकणातील वरंध घाट, रघुवीर घाट आणि कामथे घाट (एक मार्गिका बंद) बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात कोकणातून जपून प्रवास करा.
अतिवृष्टीमुळे दरड कोसळ्याचे प्रकार कोकणात सातत्याने घडतच असताच. पण गेल्या दोन वर्षात चिपळूण आणि महाडमध्ये अतिवृष्टीमुळे अतिशय भयावह परिस्थिती झाली होती. दोन्ही शहरातील वाहणाऱ्या नद्यांना महापूर आल्याने पाणी शहरात घुसलं. परिणामी शहरवासियांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं. तर दोन्ही शहरातील तालुक्यात काही ठिकाणी दरड कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला होता. त्यात रायगड जिल्ह्यातील तळीये तर रत्नागिरी जिल्ह्यातील पोसरे या गावांचा समावेश होता.
वरंध घाट बंद
अतिवृष्टी, महापूर आणि दरड सरकण्याचा प्रकार लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खेड तालुक्यातील वरंध घाट आजपासून 30 सप्टेंबरपर्यत अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वरंध घाटातून प्रवास करताना घाटातील रस्त्याच्या बाजूला उंच डोंगर असल्याने अतिवृष्टीमुळे येतील डोंगराची माती, दरड खाली येते. पावसाळ्यात या घाटातून प्रवास करताना अशाप्रकारची घटना घडून अपघात होऊ नये यासाठी हा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. तर या तीन महिन्याच्या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा आल्यास या घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आले आहे. पर्यायी मार्ग म्हणून पुण्याकडे जाण्यासाठी महाड-माणगांव-निजामपूर-ताम्हाणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे या मार्गाने तर कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर या मार्गाने प्रवास करावा.
रस्त्याला भेगा पडल्याने कामथे घाट बंद
कोकणातील मार्ग हा डोंगराळ भागातून नागमोडी वळणाचा आहे. यात या महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेले काही वर्षे सुरु आहे. महामार्ग रुंदीकरणासाठी महामार्गाच्या बाजूला येणारे डोंगर कापून रस्ता वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अतिवृष्टीत अशा भागातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या कामथे हरेकरवाडी येथील नव्याने सिमेंट कॉंक्रिटीचा रस्ता तयार करण्यात आला होता. पावसाळ्यापूर्वी महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी घाईगडबडीत हा रस्ता तयार करण्यात आला. ही घाईगडबड पहिल्याच पावसात पुढे आली. हरेकर वाडी येथील रस्त्याचा एक भाग खचला आणि महामार्ग बंद करण्यात आला. काही वेळानंतर हा महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या लेंथने वळवण्यात आली. नवीन रस्ता खचल्याने या कामाचा दर्जाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरड कोसळण्याती भीती, रघुवीर घाट बंद
तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा रघुवीर घाट सुद्धा पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रघुवीर घाट हा सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडतो. या घाटाची खेड तालुक्यातून सुरुवात होते. या घाटातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी दूरहून पर्यटक येथे नेहमीच येत असतात. परंतु घाटाच्या मार्गावर उंच डोंगररांगा असल्याने पावसाळ्यात दरड रस्त्यावर येते. म्हणून हा घाट पावसाळ्यात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Ratnagiri Monsoon : कामथे घाटात रास्ता खचला, एकपदरी मार्ग वाहतुकीसाठी बंद