BMC Election 2026: आधी भाजपने 52 जागांची ऑफर दिली पण शिंदे गटाची 127 सीटची काऊंटर ऑफर? मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय घडलं?
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेची यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे. प्रत्येक वॉर्डात भाजपने चोख नियोजन केले आहे. शिंदे गटासाठी किती जागा सोडणार?

Shivsena & BJP BMC seat sharing: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने मुंबईत शिंदे गटासाठी (Shivsena Shinde Camp) फक्त 52 वॉर्ड सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, शिंदे गटाला हा प्रस्ताव मंजूर नाही. आज भाजप (BJP) आणि शिवसेना यांच्यात मुंबईतील जागावाटपासाठी दुसरी बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी शिंदे गटाने मुंबईतील 127 प्रभागांवर दावा ठोकला आहे. (BMC Election 2026)
दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात आज भाजप आणि शिंदे गटाची जागावाटपासाठीची बैठक पार पडणार आहे. गेल्या बैठकीत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. आजच्या बैठकीत मुंबईतील प्रभागांच्या जागावाटपाबाबत लोकसभा विभागनिहाय चर्चा होणार असल्याची माहिती आहे. यावेळी प्रत्येक वॉर्डमधील राजकीय समीकरण, पक्षीय बलाबल आणि यापूर्वीच्या निवडणुकीत ही जागा कोणी लढवली होती, यावर सविस्तर चर्चा होणार आहे. मुंबईत शिंदे गटाची चांगल्यापैकी ताकद असली तरी भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये मोर्चेबांधणी करुन आपली ताकद वाढवली आहे. यंदा भाजप मुंबईत कधी नव्हे इतक्या जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. त्यासाठी भाजपने प्रत्येक वॉर्डात नियोजन केले आहे. त्यामुळे भाजप यंदा जास्तीत जास्त जागा लढवून मुंबईत भाजपचा महौपार बसवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सध्याच्या घडीला मुंबईतील आजी-माजी मिळून 127 नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेनेने 2017 च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढवण्यात आलेल्या सर्वच जागांवर दावा ठोकला आहे. सध्या शिंदे गटात गेल्या निवडणुकीत निवडून आलेले 62 नगरसेवक आहेत. परंतु, माजी नगरसेवकांची संख्या लक्षात घेता नगरसेवकांचा हा आकडा 127वर जातो. त्यामुळे आता शिंदे गटाकडून निम्म्या जागा सोडाच पण त्यापेक्षा जास्त जागांवर दावा केला जात आहे. त्यामुळे आता भाजप त्याबाबत काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आजच्या बैठकीनंतर प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांच्या ताकदीचा अहवाल तयार करुन तो वरिष्ठांकडे पाठवला जाईल. त्यानंतर जागावाटपाचा पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळत आहे.
Vasai Virar Mahanagarpalika: भाजप 23 डिसेंबरला पहिली उमेदवारी यादी जाहीर करणार
वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखती संपल्या आहेत. 115 जागांसाठी 850 हून अधिक इच्छूक उमेदवार आहेत. 23 डिसेंबरला भाजपच्या वसई-विरारच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. वसई-विरारमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहेत.
आणखी वाचा
























