![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratnagiri News : अपघात की घातपात? रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूबाबत चर्चांना उधाण
Ratnagiri News : पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या अपघाती मृत्यूबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप रिफायनरीविरोधी संघटनेने केला आहे.
![Ratnagiri News : अपघात की घातपात? रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूबाबत चर्चांना उधाण Ratnagiri news raised question on journalist shashikant warise accidental death Ratnagiri News : अपघात की घातपात? रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूबाबत चर्चांना उधाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/b4e0052caa8b22c67f2ebf0b6b1d1a791675782606379290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर (Rajapur Taluka) तालुक्यातील 'महानगरी टाईम्स' (Mahanagari Times) या वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांचा आज सकाळी उपचारादरम्यान अपघाती मृत्यू झाला आहे. राजापूर येथील पेट्रोल पंपावर त्यांना थार गाडीनं जोरात धडक दिली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरीहून कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा आज सकाळी 7.30 वाजता मृत्यू झाला आहे. शशिकांत वारिसे यांचा हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप रिफायनरीविरोधी संघटनेने केला आहे. रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणात आता कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोमवारी पत्रकार शशिकांत वारिसे त्यांच्या गाडीला पंढरीनाथ आंबेरकर याच्या कारने जोराची धडक दिली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा कोल्हापूरला मृत्यू झाला. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आंबेरकर यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.
वारिसे यांच्या निकटवर्तीयांनी मृतदेह ताब्यात न घेता तो राजापूर पोलीस स्टेशनसमोर ठेवण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी 302 चा गुन्हा पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर दाखल केला जाईल असे आश्वासन दिले. यानंतर निकटवर्तीयांनी काहीशी मवाळ भूमिका घेतली. पत्रकार वारिसे यांच्यावरती आज रात्री अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कोणत्याही दबावाशिवाय तपास करणार
या प्रकरणात पोलीस आपली भूमिका चोख बजावणार. कोणत्याही दबावाला पोलीस बळी पडणार नसल्याचे रत्नागिरी पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या तपासात फॉरेन्सिक रिपोर्ट देखील तपासले जातील. सीसीटीव्हीसह प्रत्येक बाजूंचा विचार पोलीस करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.
अपघात की घातपात? चर्चांना उधाण
राजापूर येथे झालेल्या पत्रकाराच्या अपघाती मृत्यूनंतर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. 'महानगरी टाईम्स'चे पत्रकार असलेले वारिसे यांनी कालच रिफायनरीशी संबंधित काही बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. मुख्यबाब म्हणजे ज्या थार गाडीनं त्यांना जोराची धडक दिली त्याच पंढरीनाथ आंबेरकर यांच्याशी ही बातमी निगडीत होती. त्यामुळे बातमी प्रसिद्ध होणे आणि वारिसे यांना आंबेरकर यांच्या गाडीची धडक बसणे हा निव्वळ योगायोग आहे का? असा सवाल विचारला जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)