(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur-Ratnagiri National Highway : रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग, 'या' कारणांमुळे पैसेवाटप वादाच्या भोवऱ्यात सापडणार?
Nagpur-Ratnagiri National Highway : रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी (Nagpur-Ratnagiri National Highway) कोल्हापूर जिल्ह्यात आंबा ते चोकाकपर्यंत जमीन संपादनाचे कामकाज सुरु आहे.
Nagpur-Ratnagiri National Highway : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी (Nagpur-Ratnagiri National Highway) कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा ते चौकाकपर्यंत जमीन संपादनाचे कामकाज सुरु आहे. यासाठी गावनिहाय भूसंपादनाचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देण्यासाठी शिबिरे घेतली जात आहेत. मात्र, निधी वाटपातील सुमारे 289 कोटी तीनशेवर तक्रारी दाखल झाल्याने वादात अडकण्याची शक्यता आहे.
भूसंपादन मोबदला प्रकरणात जिल्हा प्रशासनाला चार तालुक्यातून (शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले) 315 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी शाहूवाही तालुक्यातील आहेत. त्यामुळे वादावर तोडगा निघाला नसल्यास ही रक्कम न्यायालय जमा करण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार सुरु आहे. या महामार्गासाठी जिल्ह्यातील चार तालुक्यातील 49 गावांमध्ये भूसंपादन केलं जात आहे. यानुसार 12 हजार 608 शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार आहे. या भूसंपादनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 206 कोटी 72 लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यापैकी 550 कोटी चार लाखांचे अनुदान वाटप पूर्ण झाले आहे.
289 कोटी रुपये वादाच्या भोवऱ्यात
उर्वरित 656 कोटी 68 लाखांपैकी 289 कोटी रुपये वादाच्या भोवऱ्यात आहेत. या मोबदल्यावरून 4 तालुक्यातून एकूण 315 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींवर सामोपचाराने तोडगा निघाला नाही, तर हा वाद न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालय जेव्हा निकाल देईल त्यानुसार त्या मोबदल्याची वाटप करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरु आहे. देवस्थानच्या जमिनीवरूनही वाद सुरु आहे.
करवीर तालुक्यातील गावांसाठी सतेज पाटलांनी घेतली बैठक
दरम्यान, रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गासाठी करवीर तालुक्यातील शिये, भुये, भुयेवाडी, जठारवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. याचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना देताना काही ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक, अधिकारी आणि शेतकरी यांची संयुक्त बैठक मंगळवारी शासकीय विश्रामगृहात घेतली.
सतेज पाटील (Nagpur-Ratnagiri National Highway) यांनी सांगितले की, रत्नागिरी नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग करण्यात येणार आहे. या महामार्गावरील काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, काही तांत्रिक चुकीमुळे शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळालेला नाही. हायवे लगतच्या जमिनींना बिगरशेती प्रमाणे योग्य तो मोबदला मिळावा, त्यासाठी तांत्रिक चुका दुरुस्त करून घ्या व शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या