Aaditya Thackeray Security : आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत तडजोड, झेड सुरक्षा असूनही खासगी गाड्या ताफ्यात!
Aaditya Thackeray Security : आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा असूनही, त्यांच्या सुरक्षाकवचामध्ये खासगी गाड्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेमध्ये तडजोड कुणी केली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
Aaditya Thackeray Security : शिवसेना (Shiv Sena) नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज रत्नागिरी (Ratnagiri) दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यादरम्यान सुरक्षेत तडजोड झाल्याचं दिसत आहे. कारण आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा असूनही, त्यांच्या सुरक्षाकवचामध्ये खासगी गाड्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेमध्ये तडजोड कुणी केली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
आदित्य ठाकरे हे दुपारी 12.40 च्या दरम्यान रत्नागिरी विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि सुरक्षारक्षकही उपस्थित होते. मात्र त्यांना झेड दर्जाची सुरक्षा असूनही, तशा पद्धतीचं सुरक्षा कवच दिसलं नाही. त्यांच्या ताफ्यात खासगी गाड्या असल्याचं दिसून आलं.
आदित्य ठाकरे यांना झेड सुरक्षा आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत असलेल्या पोलीस तसंच सुरक्षारक्षकांना पोलिसांची गाडी असणं अपेक्षित असताना त्यांना खासगी गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या यापूर्वीच्या दौऱ्यात पोलिसांचा फौजफाटा होता, परंतु रत्नागिरी दौऱ्यात सुरक्षारक्षकांना खासगी गाड्या देऊन त्यावर पोलीस असं लेबल लावण्यात आलं आहे.
सुरक्षेची जबाबदारी सरकारची, माझ्यासाठी शिवसैनिक पुरेसे : आदित्य ठाकरे
दरम्यान, "सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. माझ्यासाठी शिवसैनिक पुरेसे आहेत," अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीत दाखल झाल्यावर दिली. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून सुरु होत.
ही राज्य सरकारची चूक : राजन साळवी
"आदित्य ठाकरेंना सुरक्षा द्यायलाच पाहिजे. शिवसैनिक सुरक्षा द्यायला खंबीर आहे. राज्य सरकारची चूक आहेच. ठाकरे परिवाराला सुरक्षा देणं त्यांचं कर्तव्य आहे. भविष्यात सुरक्षा देतील हा विश्वास आहे. आता आम्ही समर्थ आहोत, आमचे शिवसैनिक आहेत, सुरक्षाव्यवस्था आहे. हे जाणूनबुजून केलं आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी दिली.
निष्ठा यात्रेचा तिसरा टप्पा रत्नागिरीतून
शिवसेनेच्या कोकणातल्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ नेते रामदास कदम, त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रत्नागिरीत शिवसेनेसमोर आव्हान आहे.
रिफायनरी समर्थक आणि विरोधक आदित्य ठाकरेंची भेट घेणार
रत्नागिरी दौऱ्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची धोपेश्व्रर रिफायनरी समर्थक मोठ्या संख्येनी भेट घेणार आहेत. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचे पत्र राजापूरमधील शिवसैनिकच देणार आहेत. रिफायनरी समर्थक, विविध संघटना, संस्था आणि जमीन मालक घेणार आदित्य ठाकरे यांची भेट आहेत. वेदांता-फॉक्सकॉनप्रमाणे हा प्रकल्प बाहेर जाऊ नये, म्हणून शिवसेनेनी या प्रकल्पाला समर्थन करावे अशी मांडणार भूमिका आहेत. रिफायनरी समर्थकांसोबतच विरोधकही आदित्य ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.